तरच इतरांच्या अतिक्रमाणावर विचार करा अन्यथा आंदोलन करणार, मनसेचा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना इशारा
वरोरा :-
वरोरा नगरपरिषद तर्फे शहरातील अतिक्रमण काढण्याचे कार्य लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. शहरातील फुटपाथ व रस्त्यालगत ठेले व लहान दुकाने लावणाऱ्या गरीब व लघु व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान गांधी चौक परिसरात नगरपरिषदच्या जागेवर बाबुलाल चौधरी यांनी केलेले पक्के बांधकाम व त्या ठिकाणी उभारलेले आईस्क्रीम दुकान हे स्पष्टपणे अतिक्रमण असताना, त्या दुकानाचे उद्घाटन स्वतः खासदार व नगराध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर व निषेधार्ह असून अगोदर बाबुलाल आईस्क्रीमचे अवैध बांधकाम तोडा त्यानंतरचं गांधी चौकातील व इतर अतिक्रमण काढा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे, यावेळी वाहतूक सेना तालुका अध्यक्ष बाळू गेडाम,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गंधारे, महाराष्ट्र सैनिक सतीश गेडाम व मोठया प्रमाणात शहरातील अतिक्रणधारक उपस्थित होते.
सर्वसामान्य गोरगरिबांच्या दुकानावर कारवाई करण्याचे नगरपरिषद प्रशासनाचे धोरण हे पक्षपाती व अन्यायकारक आहे. एकीकडे छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविणे आणि दुसरीकडे प्रभावशाली व्यक्तींनी केलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणे, हा दुहेरी न्याय अजिबात मान्य होणार नाही. त्यामुळे गांधी चौकातील बाबुलाल चौधरी यांच्या अतिक्रमित जागेवरील आईस्क्रीम दुकानावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. शहरातील सर्व प्रकारचे अतिक्रमण कोणताही भेदभाव न करता समान न्यायाच्या तत्वावर हटविण्यात यावे. फुटपाथवरील लघु व्यवसायिकांवर कारवाई करताना त्यांचा उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्वं पिडीत अतिक्रमण धारकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून करण्यात आला. दरम्यान शहरातील इतर ज्वलंत समस्यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.




