Home भद्रावती खळबळजनक :- तर वंदना मेश्राम जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्त्या करणार?

खळबळजनक :- तर वंदना मेश्राम जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्त्या करणार?

जिल्हाधधिकारी यांना इशारा, अन्याय निवारण संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला अभिनव आंदोलनाचा संकल्प.

चंद्रपूर, प्रतिनिधी :

भद्रावती तालुक्यातील मौजा कुरोडा येथील जमीन प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत मागील 21 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या वंदना परमेश्वर मेश्राम यांनी न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिला आहे. दरम्यान मेश्राम कुटुंबाना न्याय मिळावा याकरिता अनेक सामाजिक संघटना मिळून जी अन्याय निवारण संघर्ष कृती समिती स्थापन करण्यात आली त्याची बैठक नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीत भीम आर्मी, भीम शक्ती यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी येणाऱ्या पाच दिवसात अभिनव आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे ठरविले आहे.

दरम्यान मेश्राम कुटुंबीयांचा आरोप आहे की, परमेश्वर मेश्राम यांच्या मालकीची मौजा कुरोडा येथील सर्व्हे क्रमांक 95 व 98 मधील सुमारे साडेपाच एकर जमीन तत्कालीन खासदार दिवंगत बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी दारू पाजून व धमकावून स्वतःच्या नावे करून घेतली. या जमिनीवर ताबा मिळविण्यासाठी मेश्राम कुटुंबावर गुंडांमार्फत हल्ले करण्यात आले. त्यामुळे कुटुंबाला कुरोडा गाव सोडून प्रथम बुट्टीबोरी आणि नंतर मोरवा येथे स्थलांतर करावे लागले.

दरम्यान, न्यायालयाचा निकाल मेश्राम कुटुंबाच्या बाजूने लागल्यानंतर संबंधित जमीन पुन्हा त्यांच्या नावावर करण्यासाठी फेरफार प्रक्रियेसाठी तहसील कार्यालयात अर्ज करण्यात आला. मात्र, धानोरकर परिवाराच्या दबावामुळे प्रशासनाने फेरफार केला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

का केली परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्त्या?

याच संदर्भात नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना एक लाख रुपये दिल्याचाही आरोप मेश्राम कुटुंबीयांनी केला आहे. तरीही जमीन त्यांच्या नावावर झाली नसल्याने आणि प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या परमेश्वर मेश्राम यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी भद्रावती तहसील कार्यालयात विषप्राशन करून आत्महत्या केली, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांकडे असल्याचेही सांगण्यात आले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांचेवर गंभीर आरोप?

घटनेला जवळपास आठ महिने उलटूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही तसेच जमीनही कुटुंबाला परत मिळालेली नसल्याचा आरोप करण्यात आला. विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या दबावामुळे प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर भीम आर्मी व विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचे जनआंदोलनात रूपांतर होईल, असा इशाराही देण्यात आला.

तर जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्त्या?

वंदना मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर यांनी “माझ्या पतीने ज्या प्रकारे तहसील कार्यालयात विषप्राशन करून आत्महत्या केली, त्याचप्रमाणे मला न्याय मिळाला नाही तर मीही जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन करून आत्महत्या करेन,” असा इशारा दिला. यावर जिल्हाधिकारी पंत यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून प्रकरणात आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. या भेटीदरम्यान भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोहणे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.