नागपूर विभागीय आयुक्तांनी मागवला अहवाल
भद्रावती :- भद्रावती तालुक्यातील रेती उत्खनन आणि साठवण प्रकरणात मोठा गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता निर्माण झाली असून तब्बल 96 हजार ब्रास रेती गायब झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची किंमत अंदाजे 110 कोटी रुपयांपर्यंत असल्याची चर्चा प्रशासन आणि राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
मिळालेल्या माहितीनुसार, रेती उत्खनन, साठवण आणि वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.
या कथित घोटाळ्यामुळे महसूल विभाग, खनिकर्म विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती गायब होणे हे केवळ निष्काळजीपणामुळे शक्य नसून यामध्ये मोठ्या रॅकेटचा सहभाग असू शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून अहवाल आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




