Home चंद्रपूर थरारक :- बेलगावच्या पाणी प्रश्नासाठी महिलांचा एल्गार; एक महिला चढली टॉवरवर, प्रशासनाची...

थरारक :- बेलगावच्या पाणी प्रश्नासाठी महिलांचा एल्गार; एक महिला चढली टॉवरवर, प्रशासनाची धावपळ?

मनसेच्या पुढाकाराने घागर मोर्चा; उपविभागीय अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास छेडणार पुन्हा जनआंदोलन..

वरोरा :

तालुक्यातील बेलगाव गावातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर सोमवारी महिलांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले. आंदोलनादरम्यान एका महिलेने थेट परिसरातील मोबाईल टॉवरवर चढत आंदोलनाला नाट्यमय वळण दिल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

बेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना मागील अनेक महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील सनफ्लॅग कोल अँड आयर्न कंपनीच्या भूमिगत कोळसा खाणीमुळे भुजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या असून बोरवेललाही पाणी लागत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय कंपनीकडून सुरू करण्यात आलेला आरओ प्लांटदेखील बंद असल्याने गावकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.

या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेतला. मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष बाळू गेडाम आणि शहर उपाध्यक्ष संदीप धानोरकर यांच्या नेतृत्वात घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मोर्चादरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयात आंदोलक महिलांची आणि मनसे पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू असतानाच कुसुम देवानंद वैद्य या महिलेने अचानक परिसरातील टॉवरवर चढत आंदोलन अधिक तीव्र केले. या घटनेमुळे कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. तब्बल एक तास महिला टॉवरवर आंदोलन करत असल्याने प्रशासन आणि पोलिसांची मोठी धावपळ झाली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत पाणी प्रश्नाबाबत लेखी आश्वासन देण्याची तयारी दर्शविली. पुढील दोन महिन्यांत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर संबंधित महिला टॉवरवरून खाली उतरली.

यानंतर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार सोनटक्के यांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापन, मनसे पदाधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी सनफ्लॅग कंपनीच्या व्यवस्थापकांना तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

यापूर्वी मनसेकडून शुक्रवार, 8 मे रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. सोमवारपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. मात्र, दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते याकडे आता बेलगावकरांचे लक्ष लागले आहे.