Home चंद्रपूर लक्षवेधक :- सिडीसीसी बँक नोकरभरती घोटाळा पुन्हा चर्चेत, आरक्षण बचाव संघर्ष समितीची...

लक्षवेधक :- सिडीसीसी बँक नोकरभरती घोटाळा पुन्हा चर्चेत, आरक्षण बचाव संघर्ष समितीची गोपनीय बैठक चंद्रपुरात, 

पुनः नव्या आंदोलनाची तयारी, आमदारांच्या चौकशी समितीचीला पुरावे देऊन कारवाई कारण्याची होणार जोरदार मागणी…

चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (सीडीसीसी) नोकरभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागासवर्गीय एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण डावलून तब्बल ३६० पदांच्या भरतीत प्रत्येक उमेदवाराकडून २५ ते ४० लाख रुपये उकळण्यात आल्याचा गंभीर आरोप आरक्षण बचाव संघर्ष समिती व विविध सामाजिक संघटनांनी केला आहे. या कथित घोटाळ्याविरोधात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात बँकेच्या मुख्यालयासमोर सलग २८ दिवस आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मंत्री तथा भाजप नेते Sudhir Mungantiwar यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी संपूर्ण भरती प्रक्रियेची एसआयटीमार्फत चौकशी जाहीर केली होती.

मात्र, एसआयटी चौकशीत योग्य तपास झाला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. चौकशीची गती अत्यंत संथ असून दोषींना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. यानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आंदोलनकर्त्यांनी पाठपुरावा करत हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याची मागणी केली होती. दरम्यान, मागील अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सीडीसीसी बँकेच्या नोकरभरती चौकशीचा मुद्दा उपस्थित करत, “चौकशी कासवगतीपेक्षाही कमी गतीने सुरू आहे,” अशी टीका केली. तसेच आमदार समितीद्वारे स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर आता आमदार Pravin Darekar यांच्या नेतृत्वात चौकशी समिती लवकरच चंद्रपूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील कथित आर्थिक व्यवहार, आरक्षणातील अनियमितता आणि संचालक मंडळाच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आरक्षण बचाव संघर्ष समितीचे प्रमुख राजू कुकडे व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने जनतेत तीव्र नाराजी आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

याचदरम्यान आणखी एक धक्कादायक आरोप समोर आला आहे. नोकरभरतीनंतर कर्मचाऱ्यांना कायम सेवेत ठेवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ५ लाख रुपये घेतले जात असल्याचे काही पुरावे समोर आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या नव्या आरोपांमुळे सीडीसीसी बँकेभोवतीचे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

या सर्व प्रकरणावर पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी रविवार, दिनांक १० मे रोजी सर्व समाज संघटनांची गोपनीय बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आरक्षण बचाव संघर्ष समितीकडून देण्यात आला आहे.