Home Breaking News चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग ; ४३ प्रवाशांचे थोडक्यात बचाव

चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग ; ४३ प्रवाशांचे थोडक्यात बचाव

चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग ; ४३ प्रवाशांचे थोडक्यात बचाव

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली ; बस पूर्णपणे जळून खाक, वाहतूक काही काळ विस्कळीत

चंद्रपूर :- गडचिरोलीहून चंद्रपूरच्या दिशेने येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील तब्बल ४३ प्रवाशांचे प्राण वाचले असून एक मोठी दुर्घटना टळली आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

मिळालेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक बस गडचिरोलीहून चंद्रपूरकडे प्रवाशांना घेऊन येत होती. प्रवास सुरू असताना अचानक बसमधून धूर निघू लागला. सुरुवातीला प्रवाशांना काही कळण्याच्या आत काही क्षणातच धुराचे प्रमाण वाढले आणि आगीने भीषण रूप धारण केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले.

प्रवाशांनी घाईगडबडीत बसमधून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीच्या ज्वाळा इतक्या मोठ्या होत्या की दूरवरून धुराचे लोट दिसत होते. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

या आगीमुळे चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रिक बॅटरीमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस व महामंडळ प्रशासनाकडून या घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसच्या तांत्रिक तपासणीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, चालकाच्या तत्परतेमुळे ४३ निष्पाप प्रवाशांचे प्राण वाचल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.