Home Breaking News जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेला गालबोट वाद–विवाद, आरोप–प्रत्यारोप, EVM फोडली; रोख वाटपाचे व्हिडिओ व्हायरल...

जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेला गालबोट वाद–विवाद, आरोप–प्रत्यारोप, EVM फोडली; रोख वाटपाचे व्हिडिओ व्हायरल अनेक प्रकारांनी निवडणुकीचा तापमान वाढले.

जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेला गालबोट वाद–विवाद, आरोप–प्रत्यारोप, EVM फोडली; रोख वाटपाचे व्हिडिओ व्हायरल अनेक प्रकारांनी निवडणुकीचा तापमान वाढले.

चंद्रपूर :-  जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद व भिसी नगरपंचायत निवडणुकांसाठी मंगळवारी सकाळपासून उत्साहपूर्ण वातावरणात मतदानास सुरुवात झाली. मतदानाचा उत्साह असूनही दिवसभरात घडलेल्या काही गंभीर घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले. ईव्हीएम फोडण्यापासून ते रोख वाटपाच्या चर्चेत असलेल्या व्हिडिओंपर्यंत अनेक प्रकारांनी निवडणुकीचा तापमान वाढले.

News reporter :- अतुल दिघाडे

गडचांदूरात EVM फोडली; तणावपूर्ण परिस्थिती

गडचांदूर नगरपरिषद प्रभाग ९ मध्ये राम मल्लेश दुर्गे (४०) या मतदाराने मतदान करताना ‘नगारा’ चिन्हासमोरील बटण दाबताच ‘कमळ’ चिन्हासमोरील दिवा लागल्याचा आरोप करत संतप्त होऊन मतदान यंत्र फोडले. ही घटना सायंकाळी ५.२० वाजता घडली.

घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेत अटक केली. या प्रकारानंतर काही नागरिकांनी घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर तत्काळ नवीन मशीन आणून मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव, मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत गडचांदूर शहरात धुसफूस सुरू असल्याचे समजते.


राजुरा : रोख वाटपाचे सलग व्हिडिओ व्हायरल; निवडणूक प्रक्रियेला धक्का

राजुरा नगरपालिकेच्या निवडणुकीत पैशाचे आमिष दाखवण्याच्या घटना समोर येत असून निवडणूक आयोगाच्या नियमांना छेद देणारे प्रकार सलगपणे उघड होत आहेत.

पहिला व्हिडिओ

प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील, भाजप नेते पांडुरंग सावकार चिल्लावार हे मतदारांना ५०० रुपयांच्या नोटा वाटत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे राजुरा शहरात मोठी खळबळ उडाली.

दुसरा व्हिडिओ मतदानाच्या दिवशीच

पहिल्या व्हिडिओची चर्चा थांबण्याआधीच मंगळवारी (दि. २) प्रत्यक्ष मतदान सुरू असताना आणखी एक रोखवाटपाचा प्रकार समोर आला.
काँग्रेसचे कामगार नेते सुरज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भाजप पदाधिकारी हरिदास झाडे हे प्रभागात मतदारांना पैसे देत असल्याचा आरोप करणारी दृश्यं दिसत असल्याचा दावा करण्यात आला.

या व्हिडिओमुळे निवडणूक प्रक्रियेत अनियमितता व दबाव तंत्राच्या चर्चेला पुन्हा उधाण आले असून प्रशासनाकडून याबाबत तपासाची मागणी होत आहे.


जिल्ह्यातील एकूण १,१५४ उमेदवारांचे भवितव्य EVMमध्ये बंद

दिवसभरात प्रथमच मतदान प्रक्रिया सुरळीत चालली असली तरी काही संवेदनशील भागात वाद, आरोप–प्रत्यारोप, रोख वाटपाचे प्रकार आणि EVM फोडण्याच्या घटनेमुळे निवडणुकीवर सावट दिसून आले.

जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक लढवणाऱ्या १,१५४ उमेदवारांचे भवितव्य आता EVMमध्ये बंद झाले असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


एकंदरीत निवडणुकीला गोंधळाचे आणि तणावाचे गालबोट

मतदान सुरळीतपणे पूर्ण झाले असले तरी दिवसातील प्रमुख घटना :गडचांदूर येथे EVM फोडण्याची घटना, नागरिकांची घोषणाबाजी व तणाव, मतदानादरम्यान रोखवाटपाचे सलग व्हिडिओ व्हायरल, राजुरा परिसरात चर्चेला उधाण, पोलिस व प्रशासनाची धावपळ, निवडणूक आयोग आता या सर्व घटनांचा तपास करून पुढील कारवाई करणार असून, स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण तापलेलेच राहण्याची चिन्हे आहेत.