मनपा पाणीपुरवठा विभागाची धडक मोहीम : पाणी चोरीविरोधात मोठी कारवाई, टिल्लू पंप जप्तीने नागरिकांना दिला कडक इशारा
बाबुपेठ नेताजी टाकी मागील परिसरात विशेष मोहीम; 14 – 15 टिल्लू पंप जप्त, पाणी चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू
चंद्रपूर :-. चंद्रपूर शहरात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत चालली असताना चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अमृत नळ योजना व जुन्या नळधारकांकडून होत असलेल्या पाणी चोरीविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. माननीय आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील विविध भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत असून आज बाबुपेठ परिसरातील नेताजी टाकी मागील परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान अनेक घरांची तपासणी करण्यात आली असता काही नागरिकांनी नळजोडणीवर बेकायदेशीररीत्या “टिल्लू पंप” बसवून थेट पाणी खेचल्याचे प्रकार उघडकीस आले. या कारवाईत तब्बल १४ टिल्लू पंप जप्त करण्यात आले असून संबंधित नागरिकांविरोधात पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महानगरपालिकेकडून नागरिकांना पुरेशा दाबाने आणि समतोल पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अमृत नळ योजनेअंतर्गत घराघरांत नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र काही नागरिक स्वतःच्या फायद्यासाठी नळांना टिल्लू पंप बसवून अधिक दाबाने पाणी खेचत असल्यामुळे इतर नागरिकांच्या घरांमध्ये कमी दाबाने पाणी पोहोचते. परिणामी अनेक कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मनपाच्या तपासणीत काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत. काही ठिकाणी अमृत योजनेतील पाणी मीटर काढून टाकणे, मीटरच्या आधी थेट जॉईंट घेणे, बेकायदेशीर कनेक्शनद्वारे पाणी चोरी करणे अशा प्रकारांचा मोठ्या प्रमाणावर उलगडा झाला आहे. त्यामुळे आता मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेत शहरभर व्यापक धडक तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
आज सकाळपासून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक पथक यांनी संयुक्तरित्या परिसरात तपासणी केली. अनेक घरांमध्ये अचानक पाहणी करण्यात आली. ज्या ठिकाणी टिल्लू पंप आढळून आले ते तात्काळ जप्त करण्यात आले. काही नागरिकांना जागेवरच समज देण्यात आली तर काहींवर दंडात्मक कारवाईची नोटीस देण्यात आली.
मनपा प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, नळजोडणीवर टिल्लू पंप बसवून पाणी खेचणे हा गंभीर गैरप्रकार असून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. जप्त करण्यात आलेले पंप परत मिळवणे कठीण होणार असून संबंधितांवर मोठा आर्थिक दंडही आकारण्यात येणार आहे.
तसेच शहरातील नागरिकांनी पाणी चोरीसारख्या बेकायदेशीर प्रकारांपासून दूर राहून पाण्याचा जबाबदारीने वापर करावा, प्रशासनाला सहकार्य करावे आणि इतर नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारू नये, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.




