माजी खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या पत्नी खासदार प्रतिभा धानोरकर व अनिल धानोरकर यांच्यावर अट्रॅसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची पिडीत मेश्राम परिवाराची मागणी.
चंद्रपूर :-
भद्रावती तालुक्यातील परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला पुन्हा एकदा वाचा फुटली असून, अद्यापही पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृतक परमेश्वर मेश्राम यांच्या पत्नी वंदना मेश्राम आणि मुलगा स्वप्नील मेश्राम यांनी न्याय मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या व आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन २० मे २०२६ पासून न्याय मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचे पत्रकातून जाहीर करण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर तसेच माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यावर जमीन हडपल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मेश्राम कुटुंबाची नावे संबंधित जमिनीवर करण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय तत्कालीन नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी सातबारा फेरफार करण्यासाठी 1 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्यासह तहसीलदार राजेश भंडारकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पीडित कुटुंबातील स्वप्नील मेश्राम यांना शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
पिडीत मेश्राम परिवाराच्या न्याय हक्कासाठी अनेक सामाजिक संघटनाचा पाठिंबा.
जिल्ह्यात पुन्हा एकदा परमेश्वर मेश्राम यांचे आत्महत्या प्रकरण चर्चेत आले असून जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनाचा मेश्राम परिवाराला न्याय मिळवा यासाठी पाठिंबा मिळत आहे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याने प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




