Home Breaking News अंदेवार बंधूंवर हल्ल्याचा कट उधळला; ‘छोटू’ सूर्यवंशीच्या टोळीचा बंदोबस्त – २ माऊझर,...

अंदेवार बंधूंवर हल्ल्याचा कट उधळला; ‘छोटू’ सूर्यवंशीच्या टोळीचा बंदोबस्त – २ माऊझर, २ कट्टे, ३५ काडतुसे, खंजरे जप्त

अंदेवार बंधूंवर हल्ल्याचा कट उधळला; ‘छोटू’ सूर्यवंशीच्या टोळीचा बंदोबस्त – २ माऊझर, २ कट्टे, ३५ काडतुसे, खंजरे जप्त

चंद्रपूर  :-  21 ऑक्टोबर 2025,  चंद्रपूर शहरात दिवाळीच्या काही दिवस आधी मोठा घातपात होण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असून या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. गंजवार्ड परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी दोन माऊझर, दोन देशी कट्टे, ३५ जिवंत काडतुसे आणि चार खंजर जप्त केले आहेत. या शस्त्रसाठ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या गुन्हेगारी कटाचा उलगडा झाला असून अटक केलेले आरोपी बल्लारपूर येथील रहिवासी आहेत.

News reporter :- अतुल दिघाडे

शहर पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गंजवार्ड परिसरात दादामिया ट्रान्सपोर्टसमोर सापळा रचला होता. त्या ठिकाणी दोन चारचाकी आणि एक दुचाकी वाहनातून आठ जण दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार जणांना अटक केली, तर अन्य चार आरोपी पसार झाले. पोलिसांकडून या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये चंद्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी, बोरिस श्रीनिवास कुसुमा, मुकेश राजू वर्मा उर्फ टॅक्यु आणि अमित बाडूकराम सोनकर यांचा समावेश आहे. हे चौघेही पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून बल्लारपूर येथील रहिवासी आहेत.

या घटनेचा संबंध २०२१ आणि २०२४ साली घडलेल्या दोन गोळीबार प्रकरणांशी असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. १२ जुलै २०२१ रोजी रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे आकाश उर्फ चिन्ना अंदेवार यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात छोटू सूर्यवंशी आरोपी होता. ४ जुलै २०२४ रोजी त्याच ठिकाणी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष यांच्यावर गोळीबार झाला होता. हे दोन्ही प्रकार सुरज बहुरीया हत्याकांडाशी संबंधित असल्याचा पोलिसांचा संशय आहे. बहुरीया खून प्रकरणी अंदेवार बंधूंना अटक करण्यात आली होती आणि त्या खुनाचा बदला घेण्यासाठीच या टोळीने हल्ल्याचा कट रचला असल्याचे समजते.

सध्या आकाश अंदेवार यांच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे २० ऑक्टोबर रोजी दोन्ही अंदेवार बंधू रुग्णालयात उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण १५ जण चंद्रपूरात दाखल झाले होते. त्यापैकी आठ जण गंजवार्ड परिसरात तर उर्वरित रुग्णालयात रेकी करत होते. यावरून संभाव्य हल्ल्याची तयारी रुग्णालय परिसरात सुरू होती, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संभाव्य मोठा घातपात रोखला आहे. मात्र, अंदेवार बंधूंवर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. या प्रकरणातील अटक आरोपींना शस्त्रसाठा कुठून मिळाला, त्यांच्या अन्य साथीदारांची संख्या किती आहे आणि त्यांचा उद्देश नेमका काय होता, याचा तपास सुरू आहे.