Home धक्कादायक दुर्दैवी :- अतिवृष्टीचे पैसे मिळतील म्हणून शेतकरी बैंकेत मारतोय चकरा, पण सरकार...

दुर्दैवी :- अतिवृष्टीचे पैसे मिळतील म्हणून शेतकरी बैंकेत मारतोय चकरा, पण सरकार देईना.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, अनेक शेतकऱ्यांनी केली आत्महत्त्या, राज्य शासनाचं पैकेज हवेतच?

लक्षवेधक –

हातात आलेलं सोयाबीन चं पीक अतिवृष्टीच्या तडाक्यात जमीनदोस्त झालं आणि त्यामुळे दिवाळीत आपल्या मुलाबाळांना नवीन कपडे घेणार, माझ्या घरी आलेल्या बहिणीला साडी आणि भाच्यांना कपडे घेणार हें स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न भंगल, आता सरकारने अतिवृष्टी जाहीर करून जें शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं पैकेज जाहीर केलं ते तरी दिवाळी पूर्वी वेळेवर मिळेल या आशेने शेतकरी दररोज बैंकेत जाऊन आपलं खातं तपासत आहे, पण हें नतभ्रष्ट महायुतीचं सरकार दिवाळीच्या सनासूंदीच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांची थट्टा करतं आहे, नव्हे त्यांना आत्महत्त्या करण्यास जणू प्रवृत्त करतं आहे, शोकांतिका म्हणजे सोयाबीनचं जें पीक करपलं आणि एकरी एक दोन क्विंटल झालं ते बाजारात नेलं तर त्याचा भाव दोन ते अडीच हजार क्विंटल मिळतंय मग शेतकऱ्यांनी करावं तरी काय? या विवंचनेत वरोरा तालुक्यातील आसूटकर या शेतकऱ्यांनी शेतातच विष घेऊन आत्महत्त्या केली, खरं तर ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्त्या आहे मग हाच काय कृषिप्रधान देश ज्या देशात शेतकऱ्यांना आत्महत्त्या कराव्या लागताय आणि सरकार बघ्याची भूमिका घेताहेत.

एकीकडे उद्योगपती, व्यापारी, कर्मचारी आपल्या घरी दिव्याच्या रोशनाई करताहेत पण दुसरीकडे घरी तेलाचा दिवा लावायला सुद्धा पैसे नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, हें दुर्भाग्य शेतकऱ्यांच्याच वाट्याला का? असा प्रश्न पडतो, जो शेतकरी शेतात राबराब राबतो आणि एका दाण्याचे शंभर दाने करतो पण त्याच्या वाट्याला अस्मानी सुलतानी संकट आलं की त्याला सरकार वेळेवर मदत करतं नाही मग हेच का छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालणार महायुती सरकार? माझ्या शेतकऱ्यांच्या शेतातील शेतपिकांच्या देठाला सुद्धा हात लावला तर त्यांचे हात कलम केले जाईल असा आदेश देणाऱ्या छत्रपतींच्या राज्यात त्यांच्याच नावाने केलेली कर्जमाफी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना मिळतं नाही, मग हें सरकार कुठलं सरकार आहे? शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असतांना सरकारी इमारती मात्र रोशनाईने लखलखत आहे मग यालाच शिवाशाही म्हणायची का? असा प्रश्न पडतो..

काय आहे शासनाचे पैकेज?

शासनाने दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर केले आहे. कोरडवाहू शेतीसाठी हेटरी, १८ हजार ५०० रुपये तर बागायती शेतीसाठी २७ हजार ५०० रुपये देण्याचे ठरविण्यात आले. तसेच पीकविमा घेतलेल्या शेतकर्‍यांना अतिरित भरपाईही देण्यात येणार आहे. परंतु, ही मदत अजून प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेली नाही त्यामुळे शेतकरी दररोज बँकेत जाऊन चौकशी करत आहेत.

सोयाबीनची कवडिमोल भावाने विक्री?

कारण नसताना देशात दिवाळी आणि लग्नसराईच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. केवळ एका आठवड्याच्या आत चांदीच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची (१३ टक्के) वाढ झाली आहे, तर सोन्याचे दरही ४ टक्क्‌याने वाढले आहेत. सध्या सोन्याचे दर १ लाख २३ हजार रुपये प्रतितोळा आणि चांदीचे दर १ लाख ६८ हजार रुपये किलो असे झाले आहेत. मात्र सोयाबीन चे दर वाढण्या ऐवजी कमी झाले आहेत. गतवर्षी 5 हजार ते 5 हजार 300 रुपये विकणारे सोयाबीन यावषी 2 हजार ते 3 हजार रुपयाने विकावे लागण्याची वेळ कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यावर आली आहे हें कृषी व्यवस्थेच दुर्भाग्यचं म्हणावं लागेल मात्र शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात टाकणाऱ्या सरकार ला शेतकरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बदला घेणार का? या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळात मिळणार आहे..