

दिवाळीच्या तोंडावर भेसळखोरांवर कारवाई! मूलमध्ये २२ लाखांचा भेसळयुक्त खाद्यतेल साठा जप्त
चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १४ हजार २८ क्विंटल तेल जप्त, पॅकिंगसाठी वापरले पुनर्वापरित टिन
चंद्रपूर :- (१६ ऑक्टोबर) दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मूल येथील ‘सारडा खाद्यतेल रिफायनिंग’ कारखान्यावर धाड टाकून तब्बल २२ लाख ६८ हजार ३६८ रुपयांचा १४ हजार २८ क्विंटल खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला.
News reporter :- अतुल दिघाडे
ही कारवाई पुनर्वापर केलेल्या टिनमध्ये तेलाचे पॅकिंग केल्यामुळे व कमी दर्जाचे तेल असल्याच्या संशयावरून करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रवीण उमप यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली.
भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम
दसरा आणि दिवाळीच्या काळात मिठाई, पेढे व विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याच्या घटना अनेकदा घडतात. याला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली असून, विविध भागांमध्ये तपासणी पथकेही कार्यरत आहेत.
गुप्त माहितीवरून धाड
मूल येथे भेसळयुक्त तेलाचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सहायक आयुक्त प्रवीण उमप, अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम व रावसाहेब वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश सातकर यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी विविध ब्रँडचे तेल नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
नागरिकांनी जागरूक राहावे – प्रशासनाचे आवाहन
दिवाळीमध्ये मिठाई व खाद्यतेल खरेदी करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, तसेच कुठेही भेसळ किंवा संशयास्पद खाद्यपदार्थ विक्री होत असल्यास तात्काळ चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रवीण उमप यांनी केले आहे.





