Home Breaking News सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नोकरीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नोकरीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नोकरीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला १०३ कामगारांना तात्काळ स्थायी नोकरी देण्याचे स्पष्ट निर्देश

चंद्रपूर :-  दि. १६ ऑक्टोबर राज्याचे माजी अर्थमंत्री व सध्या वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडली असून, यामध्ये विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नोकरी संदर्भातील गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

News reporter :- अतुल दिघाडे

कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन उद्योग उभारले असताना, त्याच शेतकऱ्यांना रोजगारापासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक आणि अमान्य असल्याचे मत प्रशासनाने स्पष्ट शब्दांत मांडले. त्यामुळे विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने १०३ प्रकल्पग्रस्त कामगारांना तात्काळ स्थायी नोकरी देण्याचे स्पष्ट आदेश या बैठकीत देण्यात आले.

बैठकीस चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित भागातील जनतेनेही आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या.

सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून उभा राहिलेला हा आवाज आता न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतोय. स्थानिकांना रोजगाराची हमी मिळणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून कायदेशीर बंधन आहे, हे प्रशासनाने ठामपणे अधोरेखित केले. कंपनीकडून लवकरात लवकर याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे.

या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त कुटुंबांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली असून, त्यांच्या जीवनात स्थैर्य व सुरक्षितता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.