Home Breaking News “बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” या राष्ट्रभावनेची प्रचिती देणारा मोदी सरकारचा...

“बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” या राष्ट्रभावनेची प्रचिती देणारा मोदी सरकारचा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प

 

“बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” या राष्ट्रभावनेची प्रचिती देणारा मोदी सरकारचा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली :-  विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा नवभारताच्या आत्मविश्वासाचा, आर्थिक स्थैर्याचा आणि सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट आराखडा असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” या राष्ट्रभावनेची ठळक प्रचिती देणारा हा अर्थसंकल्प असून भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत अग्रस्थानावर नेण्याचा दृढ संकल्प त्यातून स्पष्टपणे दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.

सर्व घटकांना समावेशक न्याय देणारा अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग, उद्योजक तसेच देशाच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून संतुलित व भविष्याभिमुख तरतुदी करण्यात आल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची भक्कम पायाभरणी केली असून, त्याचाच पुढचा निर्णायक टप्पा म्हणजे हा अर्थसंकल्प असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांवर भर, रोजगारनिर्मितीला चालना

रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, लॉजिस्टिक्स आणि शहरी पायाभूत सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करण्यात आली आहे. या तरतुदींमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन ‘विकसित भारत’ या संकल्पनेचा मजबूत कणा तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषी व ग्रामीण विकासाला प्राधान्य

कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. सिंचन सुविधा, कृषी प्रक्रिया उद्योग, साठवण क्षमता वाढवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी घेतलेले निर्णय हे शेतकरीहिताचे ठोस प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलाशक्ती, युवक आणि शिक्षणावर विशेष लक्ष

महिलांसाठी विशेष योजना, स्वयंरोजगार, बचत गट, स्टार्टअप्स आणि आर्थिक समावेशनासाठी दिलेले प्रोत्साहन हे ‘नारीशक्ती’ला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणारे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

तसेच युवक, शिक्षण व कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण, स्टार्टअप्स, संशोधन व नवोन्मेषाला चालना देणाऱ्या तरतुदींमुळे भारताची युवा शक्ती जागतिक स्तरावर सक्षम होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

उद्योग, MSME आणि आत्मनिर्भर भारत

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रासाठी सुलभ कर्ज, भांडवल उपलब्धता आणि उद्योगस्नेही धोरणे जाहीर करण्यात आली असून, यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला अधिक बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

संरक्षण आणि तंत्रज्ञानाला सर्वोच्च प्राधान्य

देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरण, संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. हे निर्णय भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर आणि सामर्थ्यवान बनवणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

अभ्यासपूर्ण आणि दूरगामी अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आर्थिकदृष्ट्या सबळ, सामाजिकदृष्ट्या समतोल आणि जागतिक स्तरावर प्रभावी राष्ट्र बनवण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, जबाबदार आणि दूरगामी परिणाम करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

“हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची मांडणी नसून, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा आत्मविश्वासपूर्ण संकल्प आहे. मोदी सरकारच्या या विकासाभिमुख वाटचालीला देशवासीयांचा विश्वास आणि पाठिंबा निश्चितच मिळत राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.