Home Breaking News चंद्रपूर महापौर–उपमहापौर निवडीसाठी १० फेब्रुवारीला पहिली विशेष सभा

चंद्रपूर महापौर–उपमहापौर निवडीसाठी १० फेब्रुवारीला पहिली विशेष सभा

 चंद्रपूर महापौर–उपमहापौर निवडीसाठी १० फेब्रुवारीला पहिली विशेष सभा

चंद्रपूर, दि. ३० जानेवारी :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यासाठी मा. नागपूर विभागीय आयुक्त यांनी निश्चित केल्यानुसार महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मनपाच्या राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

News Reporter : अतुल दिघाडे

ही विशेष सभा पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यानुसार महापौर व उपमहापौर निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या नगरसचिव कक्षात नामनिर्देशन पत्रे उपलब्ध असतील. गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.

विशेष सभा सुरू झाल्यानंतर, १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राणी हिराई सभागृहात पिठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. छाननीअंती वैध उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. त्यानंतर १५ मिनिटांच्या कालावधीत लेखी नोटीस देऊन उमेदवारी मागे घेता येणार आहे.

उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची नावे घोषित करून हात वर करून मतदान घेतले जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेनंतर पिठासीन अधिकारी निवडणुकीचा निकाल जाहीर करतील.

महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या निर्वाचित पालिका सदस्यांना नामनिर्देशन पत्र व ओळखपत्राची सत्यप्रत स्वतः उपस्थित राहून दाखल करणे अनिवार्य राहील. प्रत्येक उमेदवारास चारपेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार नाहीत. तसेच कोणत्याही पालिका सदस्यास एकापेक्षा अधिक उमेदवाराची नामनिर्देशन पत्रे सूचित किंवा अनुमोदित करता येणार नाहीत.


#election2026 #MayorElection #DeputyMayorElection #Chandrapur #CMC #CCMC #ChandrapurMunicipalCorporation