भाजपचा मोठा निर्णय : किशोर जोरगेवार यांची मनपा निवडणूक प्रमुख पदावरून हकालपट्टी
अजय संचेतींकडे चंद्रपूर मनपा निवडणुकीची सूत्रे — गटबाजीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न
चंद्रपूर :
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने चंद्रपूरमध्ये मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत्या गटबाजीचा फटका पक्षाला बसू नये, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांना मनपा निवडणूक प्रमुख पदावरून बाजूला सारत, माजी खासदार अजय संचेती यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या फेरनियुक्त्यांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
यापूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार किशोर जोरगेवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव, गटबाजी, नाराजीचे सूर आणि नेत्यांमधील मतभेद सातत्याने समोर येत होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाने परिस्थितीची गंभीर दखल घेत सावध पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूरसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या महानगरपालिकेत कोणतीही जोखीम न घेता, अनुभवी व संघटनात्मक पकड असलेल्या नेत्याकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी खासदार अजय संचेती यांच्याकडे मनपा निवडणूक प्रमुखपदाची सूत्रे देण्यात आल्याने पक्षात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, माजी खासदार अशोक नेते हे यापूर्वीप्रमाणेच निवडणूक प्रभारी म्हणून कायम ठेवण्यात आले आहेत.
भाजपच्या अंतर्गत सूत्रांनुसार, गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवार निवड, समन्वय बैठक, संघटनात्मक बांधणी या मुद्द्यांवर एकवाक्यता नसल्याने पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची तक्रार प्रदेश पातळीवर पोहोचली होती. त्यातूनच हा निर्णायक बदल करण्यात आल्याची चर्चा आहे.
ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या फेरबदलामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये हालचालींना वेग आला असून, पुढील रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता पक्षातील अंतर्गत वाद मिटवून सर्व घटकांना सोबत घेण्याची जबाबदारी अजय संचेती यांच्यावर असणार आहे.
गटबाजीला पूर्णविराम देत संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि निवडणुकीत भाजपला भक्कम विजय मिळवून देणे, हे मोठे आव्हान नव्या नेतृत्वासमोर उभे ठाकले आहे. या निर्णयामुळे भाजप नेतृत्वाने स्पष्ट संकेत दिले आहेत की, निवडणुकीत शिस्त, एकजूट आणि समन्वयालाच प्राधान्य दिले जाणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा बदल पुढील राजकीय घडामोडींना नवी दिशा देणारा ठरणार असून, येत्या काळात भाजपची भूमिका आणि रणनिती अधिक आक्रमक व संघटित स्वरूपात दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




