भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष टोकाला; उमेदवारांची निवड थेट नागपुरात होणार!
मुनगंटीवार–अहीर–जोरगेवार यांच्यात समन्वयाची निर्णायक बैठक आज
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास वेग दिला आहे. मात्र, सत्ताधारी भाजपमध्ये उमेदवार निवडीवरून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया चंद्रपूरऐवजी थेट येथे केंद्रित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २५) नागपुरात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक बैठक पार पडणार आहे. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार , माजी केंद्रीय मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर शहरातील विविध प्रभागांत आपापल्या समर्थकांना तिकीट मिळावे, यासाठी या तिन्ही नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपमधील गटबाजी आणि सत्तासंघर्ष इतका तीव्र झाला आहे की, त्याचे पडसाद आता रस्त्यांपासून सोशल मीडियापर्यंत उमटू लागले आहेत. विशेषतः मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले असून, त्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा अंतर्गत संघर्ष आता चंद्रपूरपुरताच मर्यादित न राहता मुंबई व नागपूरच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला आहे.
भाजपमधील वाढती अस्वस्थता आणि नाराजी पक्ष नेतृत्वासाठी मोठे आव्हान बनली आहे. उमेदवार निवडीत नेमका कोणाचा प्रभाव अधिक राहणार, निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार, तसेच कोणाच्या वाट्याला समाधान तर कोणाच्या वाट्याला नाराजी येणार—या सर्व प्रश्नांवर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सामान्य नागरिकांपासून ते पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचे लक्ष आता या घडामोडीकडे लागले आहे.
विदर्भ संघटन महामंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, भाजपचे विदर्भ संघटन महामंत्री आज नागपुरात तिन्ही नेत्यांसोबत संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीतून ठोस आणि अंतिम निर्णय निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर भाजपमधील सत्तासंतुलन नेमके कोणत्या दिशेने झुकते, हे स्पष्ट होणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपची दिशा, नेतृत्व आणि उमेदवारांची अंतिम यादी कशी असेल, याकडे आता पक्ष कार्यकर्त्यांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, नागपुरातील आजची बैठक भाजपसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.




