
मोटार वाहन निरीक्षकाला धमकी; आरटीओ एजंटवर गुन्हा दाखल
वाहन नूतनीकरण अर्ज अनुत्तीर्ण केल्याने शासकीय कामात अडथळा – चंद्रपूर आरटीओत तणावाचे वातावरण
चंद्रपूर :- प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहन तपासणीदरम्यान मोटार वाहन निरीक्षकाला धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. संजय गावंडे (वय ६१, रा. विसापूर, ता. बल्लारपूर) असे संबंधित एजंटचे नाव असून, त्यांच्या विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात बीएनएस कलम २२१ आणि ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
ध्वज सदानंद दखने (वय ३२, रा. जलनगर, चंद्रपूर) हे प्रादेशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी वाहन क्रमांक एमएच-३४ एबी १२३८ या वाहनाची नियमित योग्यता चाचणी केली. तपासणीदरम्यान वाहनात अनेक त्रुटी आढळून आल्या — वायपर कार्यरत नव्हते, वाहनाची बॉडी नुकसानग्रस्त होती, आवश्यक रेडियम टेप लावलेली नव्हती तसेच वाहनाचे टायर्स अतिशय झिजलेले होते. या सर्व तांत्रिक दोषांच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक दखने यांनी वाहनाचा नूतनीकरण अर्ज अनुत्तीर्ण केला.
या निर्णयाचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ४ दरम्यान, संजय गावंडे हे आरटीओ कार्यालयात येऊन निरीक्षक ध्वज दखने यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांना धमकी दिली. “तू माझ्या मालकाची गाडी कशी काय फेल केलीस? तुला माहिती नाही का कोणाचं वाहन आहे? कुठल्याच निरीक्षकाने आजवर माझ्या किंवा माझ्या मालकाच्या नावाचं वाहन फेल केलं नाही, आता बघ मी काय करतो!” अशा शब्दांत त्यांनी सरकारी कर्मचाऱ्याला धमकावल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.
या घटनेनंतर निरीक्षक दखने यांनी रामनगर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली असून, त्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.
दरम्यान, आरटीओच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय गावंडे हे नेहमीच आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून येत असतात. त्यांनी यापूर्वीही अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून, शासकीय कामात वारंवार अडथळा निर्माण केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. तसेच, गावंडे यांच्यावर २०१६ साली खोटे कागदपत्र तयार करून अधिकाऱ्यांच्या बोगस सहीचा वापर करत फसवणूक केल्यामुळे कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर आरटीओ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संजय गावंडे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शासकीय कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अशा एजंटांविरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घेणे अत्यावश्यक असल्याचे मत परिवहन विभागातील सूत्रांनी व्यक्त केले आहे.
या घटनेमुळे आरटीओ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





