Home Breaking News चंद्रपुरातील गुन्हेगारीला आव्हान देणारी कारवाई! अल्पवयीन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या; १ लाखाचा मुद्देमाल...

चंद्रपुरातील गुन्हेगारीला आव्हान देणारी कारवाई! अल्पवयीन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या; १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

चंद्रपुरातील गुन्हेगारीला आव्हान देणारी कारवाई! अल्पवयीन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या; १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

चंद्रपूर, दि. १७ ऑक्टोबर :-  शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तत्पर आणि धडाकेबाज कारवाईमुळे शहरात समाधानाची भावना निर्माण झाली आहे. शहरातील बिनबा गेट परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका विधीसंघर्षित अल्पवयीन मुलास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून सुमारे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

News reporter :- अतुल दिघाडे

गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना बिनबा गेट येथील शांतीधाम परिसरात एका इसमावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत तो विधीसंघर्षित बालक असल्याचे उघड झाले. पंचासमक्ष घेण्यात आलेल्या अंगझडतीत पोलिसांना सोन्याच्या दोन अंगठ्या मिळून आल्या, ज्यांची किंमत सुमारे ₹१,००,००० इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

या अल्पवयीनाने चौकशीदरम्यान घुटकाळा वॉर्ड परिसरात एका घरफोडीची कबुली दिली असून, त्या घरफोडीतूनच सदर सोन्याचे दागिने चोरले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

संपूर्ण कारवाईनंतर बालकासह जप्त मुद्देमाल चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. या प्रकरणी गु.र.क्र. 754/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305(a), 331(3), 331(4) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानीय गुन्हे शाखेच्या चिमूर उपविभागाच्या पथकाने केली असून, या कारवाईमुळे इतर काही घरफोडी प्रकरणे देखील लवकरच उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सूचित केले आहे.