कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण, १५ महिन्यांपासून केवळ ५ हजार रुपये वेतन. नव्या आंदोलनाची चिन्हे.
चंद्रपूर :
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेत नुकत्याच नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडून नोकरी कायम करण्यासाठी तब्बल ५ लाख रुपये मागितले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे बँक प्रशासनावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे सावट आले असून, कर्मचाऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल (CR) जाणीवपूर्वक खराब दाखवून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम 1979 अंतर्गत कारवाईची भीती दाखवत पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून हे सीआर अहवाल तयार केले जात असल्याचीही चर्चा आहे.
यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, ज्या उमेदवारांनी संचालकांना पूर्वीच पैसे देऊन नोकरी मिळवली, त्यांच्याकडून पुन्हा पैसे मागितले जात नाहीत. मात्र, जे उमेदवार प्रामाणिकपणे प्रक्रियेतून निवडून आले, व ज्यांनी परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनी ला पैसे दिले पण संचालकांच्या हातात पैसे मिळाले नाही त्यांनाच लक्ष्य करून ५ लाखांची मागणी होत असल्याचा आरोप आहे.
बँकेतील ३६० पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते. एका नोकरीसाठी ३० ते ४० लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल २८ दिवस बँक मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, सव्वा वर्ष उलटूनही या चौकशीचा ठोस निकाल समोर आलेला नाही. त्यामुळेच माजी मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत या प्रकरणावर आक्षेप घेत एसआयटी चौकशीबाबत प्रश्न उपस्थित करून या बॅंकेच्या नोकर भरतीची त्रिस्तरीय सदस्य आमदारांची समिती तयार करून त्याद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती.
कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण?
तब्बल १५ महिन्यांपासून बैंक कर्मचाऱ्यांना केवळ ५ हजार ते ५३०० रुपये इतकाच तुटपुंजा पगार दिला जात असल्याचे समजते. तात्पुरत्या नियुक्तीच्या नावाखाली सर्व नियम धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतनावर काम करायला भाग पाडले जात असल्याने संताप वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच या प्रकरणी मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता असून, बँक प्रशासन व शासन यांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेत भरतीपासून ते नोकरी कायम करण्यापर्यंत भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनी बैंकेची प्रतिमा मलिन झाली असून, याबाबत तातडीने निष्पक्ष चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान त्रिस्तरीय सदस्यीय आमदारांची चौकशी समिती केव्हा येणार आणि बॅंकेच्या भ्रष्ट नोकर भरतीचा पर्दापाश कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे




