दुकानदारांना मारहान करून नायर पेट्रोल पंपासह मटण शॉपी मधून पैशांची चोरी? पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष..
भद्रावती:-
शहरात सध्या ‘शेट्टी गॅंग’च्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा या गॅंगने शहरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी धुमाकूळ घालत हल्ले केल्याची व धमाकावून पैसे चोरल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एका दुकानदाराला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेट्टी गॅंगमधील काही युवकांनी आधी शहरातील एका ठिकाणी वाद घालत मारहाण केली. त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या आणि तिसऱ्या ठिकाणीही त्यांनी गोंधळ घालत दुकानदारांना व पेट्रोल वरील मालकांना धमकावून बळजबरी केली व त्यांचे गल्ल्यामधून पैसे चोरल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शहरातील नायर पेट्रोल पंपावरही या गॅंगकडून पैशांची चोरी झाल्याची तक्रार समोर आली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात युवकांनी गोंधळ घालत काउंटरमधील रोकड घेऊन पळ काढला असल्याचे सांगितल्या जात आहे.
शेट्टी गॅंगविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. तरीही या टोळीवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि पीडितांनी पोलिस प्रशासनाला इशारा दिला असून, “शेट्टी गॅंगला तात्काळ अटक करून कारवाई केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा दिला आहे.
या प्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या घटनेमुळे भद्रावती शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




