कथित अनियमितता आणि काही कर्मचाऱ्यांशी वादग्रस्त वर्तन या मुद्द्यांवरून एकाडे यांची तडकाफडकी बदली.
चंद्रपूर : –
पोलीस ठाण्यातील वादग्रस्त आणि आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेले पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांचा अखेर ‘दबदबा’ उतरल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली असून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तडकाफडकी आदेश काढत त्यांची दुर्गापूरहून थेट चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षात बदली केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे, दरम्यान या अचानक कारवाईमुळे पोलीस विभागातील वादग्रस्त ठाणेदारांची झोप उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गापूर पोलीस ठाण्यातील मालमत्ता विक्री, अंतर्गत कारभारातील कथित अनियमितता आणि काही कर्मचाऱ्यांशी वादग्रस्त वर्तन या मुद्द्यांवरून एकाडे यांच्याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे गंभीर तक्रारी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाची दखल घेत पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी यासंदर्भात सविस्तर अहवाल मागवला होता. याच पार्श्वभूमीवर एकाडे यांना डिफॉल्ट नोटीस देण्यात आली होती.
दरम्यान अचानक प्रशासनाने निर्णय घेत दुर्गापूर ठाण्यातून ठाणेदार एकाडे यांची तडकाफडकी बदली करून त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठवले. आश्चर्य म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात दोनदा कंट्रोल रूममध्ये बदली होणारे संदीप एकाडे हे पहिलेच ठाणेदार ठरल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ही बदली केवळ प्रशासकीय नसून आगामी काळात आणखी मोठी कारवाई होण्याचे संकेत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.




