
🔥 सत्तेसाठी सौदेबाजी, नगरसेवक ‘गायब’ : एक कोटींच्या बोलीत चंद्रपूर महापालिकेची लोकशाही वेठीस!
भाजपची सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचे पाच नगरसेवक पळवले? वडेट्टीवार–मुनगंटीवार मैत्री चर्चेत; नागरिकांचे प्रश्न वार्यावर
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा संघर्ष आता केवळ राजकीय डावपेचांपुरता मर्यादित राहिला नसून, तो थेट लोकशाहीच्या गाभ्यावर घाला घालणारा ठरत असल्याचे चित्र आहे. महापौरपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत नगरसेवकांची खरेदी-विक्री, पळवापळवी आणि कोटींच्या बोलीच्या चर्चा शहरभर खळबळ उडवत आहेत.
✍️ News Reporter : अतुल दिघाडे
काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवून सत्ता स्थापन होणार, अशी चिन्हे स्पष्ट असतानाच अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. काँग्रेस विधिमंडळ गटनेते यांच्या भूमिकेमुळेच ही उलथापालथ झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
🔴 पाच नगरसेवक ‘पळवले’ गेल्याची चर्चा, काँग्रेसमध्ये खळबळ
काँग्रेसमधील गटनोंदणी यशस्वी झाल्यानंतर खासदार यांनी आपल्या गटातील १३ नगरसेवकांना मोकळीक दिली. याचाच फायदा घेत भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी जिल्हाध्यक्ष यांनी धानोरकर समर्थक पाच नगरसेवकांना फितूर करून वडेट्टीवार गटाकडे वळवले, अशा तीव्र चर्चा शहरात सुरू आहेत.
या घडामोडीमुळे वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांची संख्या थेट १९ वर पोहोचल्याचे बोलले जात असून, गटनेता बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याचसोबत भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.
🤝 वडेट्टीवार–मुनगंटीवार ‘विळ्या-भोपळ्याचे सख्य’?
राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे आमदार आणि विजय वडेट्टीवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध. भाजपमधील अंतर्गत गटबाजी, एबी फॉर्म प्रकरण, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील पराभवामुळे मुनगंटीवार यांची कोंडी झालेली असताना, वडेट्टीवार यांच्या सहकार्यामुळे भाजपला सत्तेचा मार्ग मोकळा होत असल्याचा आरोप केला जात आहे.
💰 ‘एक कोटींची बोली’ – वडेट्टीवारांचा खळबळजनक खुलासा
या सर्व आरोपांना आणखी धार मिळाली ती विजय वडेट्टीवार यांच्या एका विधानामुळे. महापौरपदासाठी आवश्यक असलेला मॅजिक फिगर ३४ पूर्ण करण्यासाठी एका नगरसेवकाची बोली तब्बल एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.
जर हे आरोप खरे असतील, तर लोकशाहीचा हा उघड लिलाव नाही काय? असा थेट सवाल चंद्रपूरकर नागरिक विचारत आहेत.
🚧 प्रभागातील प्रश्न ‘जैसे थे’; नगरसेवक मात्र बेपत्ता
निवडणूक संपून अनेक दिवस उलटले असले, तरी रस्ते, पाणीपुरवठा, नाल्यांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत समस्या मात्र तशाच आहेत.
निवडणुकीपूर्वी प्रभागात फिरणारे नगरसेवक आता महापौरपदाच्या सौद्यांत गुंतल्याने ‘गायब’ झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
❓ सत्ता हवी की सेवा?
महापौर कोणाचा, उपमहापौर कोणाचा, स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार – या प्रश्नांच्या भोवऱ्यात नागरिकांचे प्रश्न अक्षरशः वार्यावर सोडले गेले आहेत.
नगरसेवकांना समस्या सोडवण्यासाठी निवडले की कोटींच्या बोलीत स्वतःची किंमत लावण्यासाठी? असा रोखठोक सवाल आता चंद्रपूरकर करत आहेत.
⚠️लोकशाहीची कसोटी
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष हा आता राजकीय पक्षांचा अंतर्गत खेळ न राहता नागरिकांच्या संयमाची परीक्षा ठरत आहे.
सत्तेच्या खुर्चीपेक्षा शहरातील प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे राजकीय नेत्यांना कधी उमजणार?
तोपर्यंत चंद्रपूरच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह कायम राहणार, हे मात्र निश्चित.





