Home Breaking News चौथ्या रेल्वे मार्गाने नागरिकांची झोप उडाली!

चौथ्या रेल्वे मार्गाने नागरिकांची झोप उडाली!

चौथ्या रेल्वे मार्गाने नागरिकांची झोप उडाली!

वर्धा–बल्लारपूर १३५ किमी चौथी रेल्वे लाईन; वरोरा शहरासह शहरी व ग्रामीण भागातील जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव

वरोरा :-  वर्धा ते बल्लारपूर दरम्यान चौथी रेल्वे लाईन टाकण्याबाबत रेल्वे मंत्रालयाने अधिकृत अधिसूचना जाहीर केल्याने वरोरा शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. ही रेल्वे लाईन मुख्यत्वे ग्रामीण भागातून जाणार असली, तरी वरोरा शहरातील काही रहिवासी वसाहतींमधील जमीन व घरांचे अधिग्रहण होणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित प्रभागांतील नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

वर्धा–बल्लारपूर ही चौथी रेल्वे लाईन सुमारे १३५ किलोमीटर लांबीची असणार आहे. या प्रस्तावित मार्गामध्ये वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील विवेकानंद कॉलनी, बँक ऑफ महाराष्ट्र कॉलनी व आसपासचा परिसर, तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील शांतिवन ले-आउट व देशपांडे ले-आउट या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश असल्याचे अधिसूचनेत नमूद आहे. यामुळे अनेक कुटुंबांची घरे, प्लॉट्स व इतर मालमत्ता अधिग्रहणाच्या कक्षेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरासोबतच वरोरा तालुक्यातील दहेगाव, निमसाळा, मोबाडा, चिकणी, तडाळा, भोपापूर, नागरी, खापरी, जामखुला, गोळ (बु.), गोळ (खु.), मसाळा, डोंगरगाव, चिनोरा, खांजी, वरोरा एक-अर्जुना आदी गावांतील शेतजमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. तसेच भद्रावती तालुक्यातील देऊरवाडा, माजरी, कुणाडा विसलोनी, पळसगाव, कुडारीट, कोंडा, घोडपेठ, वडगाव, रीट, गवराळा, नंदुरी, विजास या गावांचाही प्रस्तावित रेल्वे मार्गात समावेश आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण आहे.

३० दिवसांत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, या चौथ्या रेल्वे लाईनबाबत कोणालाही आक्षेप असल्यास अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, वरोरा यांच्याकडे लेखी स्वरूपात आक्षेप नोंदविता येणार आहेत. नागरिक, शेतकरी व मालमत्ताधारकांनी आपले सर्वे नंबर, मालकी हक्काचे कागदपत्रे व हरकती वेळेत सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अनेक घरांची नावे अधिसूचनेत नसल्याने संभ्रम

वरोरा शहरातील काही वसाहतींमधील अनेक घरांची नावे अधिसूचनेत नसल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपली मालमत्ता अधिग्रहणाच्या कक्षेत येते की नाही, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून, काहींनी प्रशासनाकडे चौकशीसाठी धाव घेतली आहे. चुकीने काही मालमत्ता समाविष्ट तर काही वगळल्या गेल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाचा खुलासा

या संदर्भात बोलताना संदीप भस्के, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, वरोरा यांनी सांगितले की,
“स्थानिक नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्यात येणार असून, वगळलेले सर्वे नंबर समाविष्ट केले जातील आणि चुकीने समाविष्ट झालेले सर्वे नंबर व मालमत्ता गाळण्यात येतील. नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत प्रक्रियेत सहभागी व्हावे.”

दरम्यान, चौथ्या रेल्वे लाईनमुळे भविष्यात वाहतूक सुलभ होणार असली तरी, तत्काळ होणाऱ्या जमीन व घरांच्या अधिग्रहणामुळे वरोरा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची झोप उडाल्याचे वास्तव समोर आले आहे. आता पुढील ३० दिवसांत नागरिकांच्या आक्षेपांवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.