लेआऊटधारक धास्तावले चंद्रपूर तहसीलदारांची ९८ जणांना नोटीस
चंद्रपूर :- चंद्रपूर इरई नदीकाठावरील दहा गावांतील पूरग्रस्त भागात धनदांडग्यांनी लेआऊट टाकून अनधिकृत विक्री सुरू केली. हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात येताच चंद्रपूर तहसीलदारांनी ९८ लेआऊट मालकांना नोटीस बजावली. या नोटिसीचे कारवाईत रूपांतरित होते की, प्रकरण तडजोडीत विरून जाते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
चंद्रपूर शहराचा विस्तार होण्यास केवळ दाताळा परिसरच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शहरातील धनदांडग्यांनी चंद्रपूर तालुक्यातील इरई नदी तीरावरील दाताळा, कोसारा, चोराळा, देवाडा, आरवट, हिंगणाळा, शिवणी चोर, बोररीठ, पडोली व खुटाळा या गावांतील अल्प किमतीत भूखंड विकत घेतले. प्रशासनाच्या माहितीनुसार, एकूण १३५.०९ हेक्टर क्षेत्रावरील भूखंडात अनेकांनी गुंतवणूक करून ठेवली. आता जमिनीची डिमांड वाढल्याने अनधिकृत लेआऊट टाकून विक्री सुरू केली. यातून भूखंडमाफियांची एक लॉबीच तयार झाली आहे. अल्पदराने खरेदी केल्यानंतर जमिनी भूलथापा देत चढ्या भावाने प्लॉट विक्री करण्याचा सपाटा सुरू झाला. सद्यस्थितीत लेआऊटमध्ये कोणत्याही पायाभूत सोयीसुविधा नाहीत, हे विशेष,
पूररेषेची पर्वा नाही
पूर आल्यास दाताळा, कोसारा, चोराळा, देवाडा, आरवट, हिंगणाळा, शिवणी चोर, बोररीठ, पडोली व खुटाळा गावांना मोठा फटका बसतो. पुरामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्रात चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पूररेषा (ब्ल्यू लाईन) आखली. हा परिसर पूरग्रस्त असल्याने कोणतेही लेआऊट पाडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.
■ इरईच्या काठावरील १० गावांतील निळ्या रेषेत येणाऱ्या अनधिकृत ९८ लेआऊट मालकांना नोटीस बजावली.
नोटरींनाही यासंदर्भात पत्र देऊन जमीन हस्तांतरणाचे व्यवहार न करण्याचे निर्देश दिले आहे. बहुतांश लेआऊट मालकांनी अद्याप लेआऊटची कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे पथकाकडून चौकशी सुरू आहे.
विजय पवार, तहसीलदार, चंद्रपूर




