वंदना मेश्राम यांची खासदार व महसूल अधिकाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे गुन्हे दाखल करण्याची मागणी. गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन तीव्र करणार?
चंद्रपूर, दि. १५ जून :
भद्रावती तालुक्यातील जमीन फेरफार प्रकरणात दीर्घकाळ न्याय न मिळाल्याने पतीने तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप करत त्यांच्या पत्नीने विद्यमान खासदार, तहसीलदार, नायब तहसीलदार व संबंधित महसूल अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व अट्रॅसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 26 दिवसापासून वंदना मेश्राम यांच्या ठिय्या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनाचा पाठिंबा मिळत असल्याने विद्यमान खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या गोटात कमालीची अस्वस्थता दिसतं आहे.
वंदना परमेश्वर मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती स्व. परमेश्वर विश्वनाथ मेश्राम यांनी २६ सप्टेंबर २०२६ रोजी भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेस महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून झालेला कथित मानसिक छळ, सातत्याने झालेली दिरंगाई आणि राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारीनुसार, सर्व्हे क्रमांक ८६, ८७, ९५ आणि ९८ संदर्भातील जमीन वाद प्रकरणात भद्रावती दिवाणी न्यायालयाने १२ ऑगस्ट २०१५ रोजी दिलेला निर्णय हा जिल्हा सत्र न्यायालयाने २३ सप्टेंबर २०२२ रोजी कायम ठेवला होता. न्यायालयीन निर्णयानंतर संबंधित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद घेण्यासाठी स्व. परमेश्वर मेश्राम यांनी महसूल विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
धानोरकर परिवार आणि महसूल अधिकाऱ्यावर का होतं नाही गुन्हा दाखल?
मौजा कुरोडा येथील सर्व्हे क्रमांक ९५ व ९८ बाबत उच्च न्यायालयाची स्थगिती संपली असतांना व सर्व्हे क्रमांक ८६ व ८७ संदर्भात कोणतीही स्थगिती नसताना फेरफार प्रक्रिया मुद्दाम रखडविण्यात आल्याचा आरोप वंदना मेश्राम यांनी तक्रारीत करून दिवंगत खासदार बाळू धानोरकर, विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर, अनिल धानोरकर यांच्या राजकीय दबावामुळे महसूल अधिकाऱ्यांनी जमिनीचा फेरफार घेतला नाही, दरम्यान नायब तहसीलदार यांना दोन वेळा प्रत्येकी ५० हजार रुपये, अशी एकूण एक लाख रुपयांची रक्कम दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही काम न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याची भावना स्व. मेश्राम यांनी व्यक्त केली होती, असा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे, अर्थात या जमिनीच्या प्रकरणात धानोरकर परिवाराचा राजकीय दबाव व महसूल अधिकारी यांच्याकडून मानहानीकारक वागणूक यामुळे परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्त्या केली ती बाब त्यांनी आपल्या सुसाईट नोट मध्ये लिहून ठेवली आहे, असं असतांना पोलिसांनी त्यावेळी संबंधितावर गुन्हे का दाखल केले नाही याबद्दल कायदेतज्ञानी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पोलीस अधीक्षक नोपानी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष?
“जर सातबारा फेरफार केला नाही, तर मी तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करीन,” असा इशारा स्व. मेश्राम यांनी अनेकदा दिला होता. त्यावर “तुला काय करायचे ते कर,” असे उत्तर देत नायब तहसीलदारांनी परमेश्वर मेश्राम यांना हिणविल्याचा गंभीर आरोप वंदना मेश्राम तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे मानसिक तणाव वाढून स्व. परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करत वंदना मेश्राम यांनी संबंधितांवर भारतीय न्याय संहिता अनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या तक्रारीच्या प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पोलीस महानिरीक्षक नागपूर विभाग आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.




