दिलीप पुंडलिक ढाले यांच्यामार्फत बिअर बार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी.
वरोरा, प्रतिनिधी :
तालुक्यातील मौजा टेमुर्डा येथे प्रस्तावित बिअर बार, देशी-विदेशी दारू दुकान तसेच इतर मादक पदार्थांच्या विक्री केंद्रांना परवानगी देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थ व महिला मंडळाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गावात बिअर बार अथवा दारू विक्री केंद्र सुरू झाल्यास महिला, शालेय विद्यार्थी, युवक-युवती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर व सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यापूर्वी झालेल्या महिला सभा व ग्रामसभेत गावात कोणत्याही प्रकारच्या दारू विक्रीला विरोध दर्शविणारे ठराव मंजूर करण्यात आले असून ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मौजा टेमुर्डा येथील सर्व्हे क्रमांक 257/1 मधील प्लॉट क्रमांक 1, मालमत्ता क्रमांक 1252 या ठिकाणी दिलीप पुंडलिक ढाले यांच्यामार्फत बिअर बार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या जागेच्या लगतच महिलांसाठी खुल्या जिमची सुविधा उभारण्यात आली असून खासदार निधीतून वाचनालयाचे बांधकाम सुरू आहे. तसेच जवळच पोलीस चौकीचे बांधकामही करण्यात आले आहे, अंगणवाडी आणि शाळा आहेत अशा परिस्थितीत त्या ठिकाणी बिअर बारला परवानगी देणे कायदा व सुव्यवस्थेच्या तसेच महिलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दारू विक्रीमुळे सामाजिक शांतता भंग होणे, युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढणे, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होणे तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामसभेचे ठराव आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन टेमुर्डा येथील या शिक्षक कॉलनी परिसरात बिअर बारची परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा अजित पवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनाही पाठविण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.




