Home Breaking News बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी डॉ. अशोकभाऊ जीवतोडे; शिक्षण, समाजकारण आणि संघटन कौशल्याचा प्रेरणादायी...

बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी डॉ. अशोकभाऊ जीवतोडे; शिक्षण, समाजकारण आणि संघटन कौशल्याचा प्रेरणादायी प्रवास

बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी डॉ. अशोकभाऊ जीवतोडे; शिक्षण, समाजकारण आणि संघटन कौशल्याचा प्रेरणादायी प्रवास

डॉ. अशोकभाऊ जीवतोडे; यांना  भूमिपुत्राची हाक साप्ताहिक तथा न्यूज पोर्टल परिवारकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹🎂

चंद्रपूर :- पूर्व विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे, शिक्षणाचा समृद्ध वारसा जपत समाजजागृतीची प्रभावी चळवळ उभी करणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजनेते व संघटक डॉ. अशोकभाऊ जीवतोडे यांचा ११ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

११ जून १९६१ रोजी चंद्रपूर येथे जन्मलेल्या डॉ. जीवतोडे यांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षण, समाजकारण आणि संघटन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. एम.कॉम., एम.एड., एम.फिल. (वाणिज्य), एम.ए. (अर्थशास्त्र), पीएच.डी. (शिक्षणशास्त्र) आणि पीएच.डी. (वाणिज्य) अशी त्यांची उच्च शैक्षणिक पात्रता असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत.

स्वर्गीय शिक्षणमहर्षी श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेत त्यांनी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून यशस्वी नेतृत्व केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सातत्याने प्रगती करत असून हजारो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी होत आहे.

डॉ. जीवतोडे यांनी जनता शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष, गोंडवाना विद्यापीठाचे अधिष्ठाता व अध्यक्ष, तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सहभागी सदस्य अशा विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. शासनाच्या विविध शैक्षणिक समित्यांमध्येही त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जाते.

उत्कृष्ट संघटन कौशल्याची ओळख

विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांच्यात समतोल साधत संस्थेची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याचे अद्वितीय कौशल्य त्यांच्याकडे आहे. विलक्षण स्मरणशक्ती, वेळेचे काटेकोर नियोजन, माणसांची अचूक पारख आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात.

त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणारे कार्यक्रम हे केवळ कार्यक्रम राहत नाहीत, तर ते संस्मरणीय सोहळे ठरतात. सूक्ष्म नियोजन, भव्य आयोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे त्यांच्या कार्यक्रमांना स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे.

सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व

शैक्षणिक क्षेत्राबरोबरच वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान, सामुदायिक विवाह सोहळे, कीर्तन-व्याख्यानांद्वारे जनजागृती अशा अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे.

स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळ आणि ओबीसी समाज चळवळीत त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. विदर्भाच्या प्रश्नांवर जनमत जागृत करण्यासाठी नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत व्यापक जनसंपर्क मोहीम राबविली. दरवर्षी १ मे रोजी हजारो विदर्भप्रेमींच्या उपस्थितीत विदर्भ राज्याचा प्रतीकात्मक ध्वज फडकावण्याची परंपरा त्यांनी जोपासली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून पूर्व विदर्भात ओबीसी समाजाचे मजबूत संघटन उभे करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ८ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर येथे झालेल्या ऐतिहासिक ओबीसी मोर्चामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून तब्बल २२ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. या व्यापक जनआंदोलनामुळे ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला, असे मानले जाते.

संवेदनशीलता आणि माणुसकीचा संगम

मोठ्या संस्थेचे प्रमुख असूनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नाही. साधेपणा, विनम्रता आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा स्वभाव हीच त्यांची खरी ओळख आहे. अनेक गरजू कुटुंबांना त्यांनी निःस्वार्थ मदतीचा हात दिला. शिक्षण, रोजगार, विवाह आणि घरासाठी त्यांनी अनेकांना आर्थिक व सामाजिक आधार दिला; मात्र या मदतीची कधीही प्रसिद्धी केली नाही.

एका गरीब कर्मचाऱ्याला नोकरीसाठी दुचाकीची आवश्यकता असल्याचे समजताच त्याला तत्काळ दुचाकी उपलब्ध करून देण्याचा प्रसंग आजही अनेकजण आवर्जून सांगतात.

शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी

पुणे, मुंबई, नागपूर किंवा हैदराबाद येथे मिळणाऱ्या दर्जेदार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सुविधा त्यांनी चंद्रपूरमध्ये उपलब्ध करून दिली. जनता करिअर लॉन्चरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्याचा संवेदनशील निर्णयही त्यांनी घेतला.

प्रेरणादायी कार्याचा गौरव

शिक्षण, समाजकारण, नेतृत्व, संघटन कौशल्य, संवेदनशीलता आणि दूरदृष्टी यांचे सुंदर मिश्रण म्हणजे डॉ. अशोकभाऊ जीवतोडे. त्यांनी घडविलेली माणसे, उभारलेल्या संस्था आणि समाजासाठी उभ्या केलेल्या चळवळी हेच त्यांच्या कार्याचे खरे स्मारक आहे.

वाढदिवसानिमित्त डॉ. अशोकभाऊ जीवतोडे यांना हार्दिक शुभेच्छा! ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड कार्यशक्ती प्रदान करो, हीच सदिच्छा.

– प्रा. रविकांत वरारकर
जनता महाविद्यालय, चंद्रपूर