Home महाराष्ट्र अभिनंदनीय :- मनोज मोडक यांचा “मूकनायक नॅशनल अवॉर्ड २०२६” देऊन गौरव.

अभिनंदनीय :- मनोज मोडक यांचा “मूकनायक नॅशनल अवॉर्ड २०२६” देऊन गौरव.

जनतेच्या ज्वलंत प्रश्नाला प्रशासनाकडे मांडून पत्रकारिता करणाऱ्या मोडक यांचा सामाजिक क्षेत्रात मोठा प्रभाव.

भद्रावती :-

भद्रावती येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मनोज मोडक यांना पत्रकारिता आणि समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा “मूकनायक नॅशनल अवॉर्ड २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नांदेड येथून प्रकाशित होणारे दैनिक वीर शिरोमणी तसेच दैनिक व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नांदेड जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या या दिमाखदार कार्यक्रमाला राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, शासकीय अधिकारी, पत्रकार, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. समाजात न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तसेच पत्रकारिता क्षेत्रातून समाजहित जपणाऱ्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार मनोज मोडक यांना प्रदान करण्यात आला.

मनोज मोडक हे लॉर्ड बुद्धा टीव्हीचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून पुरोगामी पत्रकार संघाच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळत आहेत. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेची व समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची विविध स्तरांतून प्रशंसा होत आहे.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान समाजातील वंचित, शोषित आणि सर्वसामान्य जनतेच्या संघर्षाला समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. “मूकनायक नॅशनल अवॉर्ड २०२६” मुळे भद्रावतीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून विविध सामाजिक, पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून मनोज मोडक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.