Home चंद्रपूर क्राईम ब्लास्ट :- बल्लारपूरात १७ वर्षीय तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या.

क्राईम ब्लास्ट :- बल्लारपूरात १७ वर्षीय तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या.

पोलिसांच्या पाच तुकड्या शोधात आणि २४ तासांत पाच आरोपी ताब्यात.

बल्लारपूर :-

बल्लारपूर शहरातील विसापूर गावात भररस्त्यात १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वैमनस्यातून हा थरारक खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत कारवाई करत एका विधीसंघर्ष बालकासह पाच आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेतले आहे.

मृत तरुणाचे नाव विराज आगधारी (वय १७) रा. किल्ला वॉर्ड, बल्लारपूर असे आहे. त्याचेसोबत गौरव कुकुडकर व लक्ष्मण वासेकर हे दोघे होते आणि यापैकी एकाने आरोपीला मृतकाचे लोकेशन दिले असल्याची चर्चा आहे, दरम्यान, बल्लारपूर येथून आलेल्या गुंडांच्या टोळीने विराजचा पाठलाग करून भररस्त्यात त्याच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार करून व दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत नागपूर येथून आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणात जिशान सिद्दीकी, समीर शेख, राजरतन निषाद, मोनू निषाद व सलमान शेख यांची नावे समोर आली असून, एका विधीसंघर्ष बालकाचाही सहभाग असल्याची माहिती आहे. ही टोळी किसन सूर्यवंशी गँगशी संबंधित असल्याची चर्चा सूत्रांकडून समोर येत आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे बल्लारपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी केली जात आहे.