जनता कॉलेज चौकातील मित्र परिवारांचा सामाजिक उपक्रम
उन्हाच्या तीव्रतेत नागरिकांसाठी थंड पाण्याची पाणपोई सुरू; समाजसेवेचा आदर्श संदेश
चंद्रपूर :- शहरातील जनता कॉलेज चौक हे केवळ व्यापारी केंद्र नसून समाजकार्य, धर्मकार्य आणि नागरिकांसाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या सेवाभावी मित्र परिवारामुळे एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. या चौकातील दुकानदार व मित्र परिवार नेहमीच सामाजिक बांिलकी जपत विविध उपक्रम राबवत असतात. याच सेवाभावी परंपरेतून आता उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांची तहान भागविण्यासाठी येथे थंड पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. जनता कॉलेज चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असून येथे बस स्टॉप असल्यामुळे विविध भागांतून येणाऱ्या बसेस, प्रवासी, विद्यार्थी, कामगार व नागरिकांची नेहमीच मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे जनता कॉलेजमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे साईभक्तांचीदेखील येथे सतत ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत पिण्याच्या थंड पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी आणि कोणालाही पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, या हेतूने जनता कॉलेज चौकातील दुकानदार व मित्र परिवारांनी एकत्र येत हा स्तुत्य उपक्रम राबविला.

या उपक्रमामुळे परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून सामाजिक बांधिलकीचा एक सुंदर संदेश समाजासमोर गेला आहे. “समाजासाठी काहीतरी करण्याची भावना असेल तर मोठ्या पदाची किंवा संपत्तीची गरज नसते,” हे या मित्र परिवाराने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

जनता कॉलेज चौकातील दुकानदार आणि मित्र परिवार यापूर्वीही अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेत आले आहेत. दरवर्षी १४ एप्रिल निमित्त भोजनदान, रामनवमीच्या दिवशी भोजनदान, परिसरात वृक्षारोपण व झाडांचे संगोपन, तसेच गुरुवारी साईभक्तांच्या गर्दीत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे मंडळी सातत्याने करीत असतात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी आणि आदराची भावना निर्माण झाली आहे.
या थंड पाण्याच्या पाणपोई उपक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून आनंद चकिनारपवार, अतुल दिघाडे यांनी पुढाकार घेतला. तसेच यादव काका, मनोहर गाठे, अमोल दिघाडे, विकास माणुसमारे, विजय ननावरे, प्रकाश गाठे, सचिन दिघाडे, गोपाल काका, कुंदन धानोरकर, सूरज गावडे, प्रवीण दिघाडे, धीरज आणि जठार काका यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्वांच्या एकत्रित सहभागातून हा उपक्रम यशस्वी झाला असून परिसरातून या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे.
उन्हाच्या कडाक्यात तहानलेल्या नागरिकांना थंड पाण्याचा दिलासा देत जनता कॉलेज चौकातील मित्र परिवाराने समाजासमोर माणुसकीचा आणि सेवाभावाचा एक आदर्श निर्माण केला आहे.





