मनपा पाणी पुरवठा विभागातील धडक कारवाई सुरू : नळ योजनेत पाणी चोरी करणाऱ्यांवर मोठी कारवाई
नळाला टिल्लू पंप लावणाऱ्यांचे पंप होणार जप्त; बालाजी वॉर्ड, दानववाडीत आजपासून मोहिमेला सुरुवात
चंद्रपूर :- उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाढत असताना शहरात अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अमृत नळ योजना व जुन्या नळधारकांमध्ये सुरू असलेल्या पाणी चोरीविरोधात धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. माननीय आयुक्तांच्या आदेशानुसार आज बालाजी वॉर्डातील दानववाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासणी व कारवाई करण्यात आली.
News reporter :- अतुल दिघाडे
महानगरपालिकेकडून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा योग्य व समतोल पुरवठा व्हावा यासाठी अमृत नळ योजनेअंतर्गत नळजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र काही नागरिकांकडून या नळजोडण्यांवर थेट टिल्लू पंप बसवून पाणी खेचले जात असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर आले आहेत. यामुळे परिसरातील इतर नागरिकांच्या नळांना अतिशय कमी दाबाने पाणी येते व अनेकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

विशेष म्हणजे काही ठिकाणी अमृत नळ योजनेतील मीटर काढून टाकणे, मीटरच्या आधी थेट जॉईंट घेणे तसेच बेकायदेशीर पद्धतीने पाणी चोरी करणे असे प्रकारही महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहेत. त्यामुळे आता मनपाने कठोर भूमिका घेत शहरभर धडक तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
आज सकाळपासून बालाजी वॉर्डातील दानववाडी परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत अनेक घरांची तपासणी केली. या कारवाईदरम्यान काही ठिकाणी टिल्लू पंप आढळून आले असून संबंधितांवर पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मनपा प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जे कोणी नळजोडणीवर टिल्लू पंप लावून पाणी खेचताना आढळतील त्यांचे पंप तात्काळ जप्त करण्यात येतील. तसेच पाणी चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून मोठा आर्थिक भुर्दंडही आकारण्यात येणार आहे. एकदा जप्त करण्यात आलेले टिल्लू पंप परत मिळणे कठीण असल्याने नागरिकांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या मोहिमेसाठी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम शहरातील विविध भागांमध्ये अचानक तपासणी करून पाणी चोरी, बेकायदेशीर जोडण्या आणि टिल्लू पंप वापरणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.
उन्हाळ्यात प्रत्येक नागरिकाला समान प्रमाणात पाणी मिळावे, पाणीटंचाई कमी व्हावी आणि पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे आता चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सावध राहून नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे.
मनपाच्या या धडक मोहिमेमुळे पाणी चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काही दिवसांत शहरभर मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





