Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपुरात तेलंगणातील अवैध सावकारांचे जाळे? पैसे न देणाऱ्या ग्राहकांना धमक्या?

खळबळजनक :- चंद्रपुरात तेलंगणातील अवैध सावकारांचे जाळे? पैसे न देणाऱ्या ग्राहकांना धमक्या?

मनसेचा गंभीर आरोप; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी, अन्ना लोकांची दादागिरीची भाषा...

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे चंद्रपूर शहरात आणि परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध सावकारी प्रकरणाविरोधात मोठी कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणा राज्यातील काही व्यक्ती चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय चालवत असून हजारो कुटुंबांना आर्थिक जाळ्यात अडकवले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सावकारांकडून गरजू नागरिकांना १० हजार रुपयांचे कर्ज देऊन त्याबदल्यात १२ हजार रुपयांपर्यंत वसुली केली जात असल्याचे सांगितले जात आहे. कोणतीही अधिकृत बँकिंग परवानगी अथवा वित्तीय नियमांचे पालन न करता हा व्यवहार सुरू असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांना धाब्यावर बसवून हा आर्थिक व्यवहार सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात “करी व्यंकटा रामा रेड्डी” नावाचा व्यक्ती वसुली एजंट म्हणून काम पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जदारांनी वेळेवर पैसे परत न केल्यास त्यांच्या घरांची विक्री करून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही सांगण्यात आले. काही प्रकरणांमध्ये कर्जदारांची दुचाकी व चारचाकी वाहने जबरदस्तीने जप्त केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागात अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबे या कथित सावकारीच्या विळख्यात अडकली आहेत. रोजंदारीवर काम करणारे कामगार, लहान व्यापारी आणि आर्थिक अडचणीत असलेले नागरिक यांना जलद कर्जाचे आमिष दाखवून मोठ्या व्याजदराने पैसे दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेकडून लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असून संबंधित सावकार, वसुली एजंट आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रात बाहेरील राज्यांतून येऊन बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा आणि अवैध सावकारीमुळे होणारे आर्थिक व मानसिक शोषण थांबवावे, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.