Home Breaking News चंद्रपूर महापौरपदावरून ‘राजकीय भूकंप’ र्ची चाहूल !

चंद्रपूर महापौरपदावरून ‘राजकीय भूकंप’ र्ची चाहूल !

चंद्रपूर महापौरपदावरून ‘राजकीय भूकंप’ र्ची चाहूल !

नागपूर येथे शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली?

चंद्रपूर :-  चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाच्या राजकारणाने सध्या शहरात चांगलाच तापमान वाढवला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादानंतर परिस्थिती काहीशी स्थिर झाली असली, तरी बहुमताचा आकडा स्पष्ट नसताना महापौरपदावर कोण विराजमान होणार हा पेच कायम आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनिश्चिततेचे ढग दाटलेले दिसत आहेत.

News reporter :-  अतुल दिघाडे

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने “महापौर आमचाच” असा ठाम पवित्रा घेतल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर येथे शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्ह उपस्थित होते. सत्ता वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून एक प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याचे समजते. येत्या दोन दिवसांत दोन्ही पक्ष संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष

गेल्या १५ दिवसांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोड्या सुरू होत्या. नगरसेवकांची पळवापळवी, गटबाजी आणि वर्चस्वासाठीची चढाओढ यामुळे मित्रपक्षाशी सुसंवाद साधण्याकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या रणनीतीऐवजी अंतर्गत ‘नेतृत्व युद्ध’ रंगले होते, अशी टीका राजकीय निरीक्षक करत आहेत.

सत्ता वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला

राजकीय सूत्रांनुसार, पहिली अडीच वर्षे शिवसेना ठाकरे गटाचा महापौर आणि पुढील अडीच वर्षे मित्रपक्षाचा महापौर असा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत आहे. राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वडेट्टीवार-धानोरकर वाद शांत, पण…

एकीकडे विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद मिटल्याची चर्चा असताना, दुसरीकडे नव्या समीकरणांची बीजे रोवली जात आहेत. त्यामुळे शहरातील राजकारण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.

नागरिक संभ्रमात

महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार? कोणाची कोणासोबत युती होणार? शेवटच्या क्षणी कोण पाला बदलणार? या सर्व प्रश्नांमुळे नगरसेवकांसह नागरिकही संभ्रमात आहेत. पुढील ४८ तासांत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या तरी चंद्रपूरच्या राजकारणात “सस्पेन्स” कायम असून, अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी सर्वांचे लक्ष येत्या दोन दिवसांकडे लागले आहे.