
कांग्रेसच्या अंतर्गत कलहात भाजपची सत्ता येणार, उबाटा -वंचित ठरतेय किंगमेकर!
चंद्रपूर / नागपूर, :- चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे गणित दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. रोज नव्या घडामोडी, दबावतंत्राचे राजकारण, अंतर्गत कुरघोडी आणि संभाव्य फोडाफोडीच्या चर्चांमुळे महापालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. महापौर निवडीसाठी आवश्यक असलेला मॅजिक फिगर ३४ गाठण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू असून, या सत्तासंघर्षात सध्या खासदार धानोरकर यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठानी टाकलेली जबाबदारी त्या पेलणार की त्यांचा गेम होणार यांबद्दल चर्चेला उधान आले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
काँग्रेसकडे संधी, पण अंतर्गत वादांमुळे गोंधळ
आकडेमोड पाहता महापौर बसविण्याची गणिते काँग्रेससाठी भाजपाच्या तुलनेत सोपी वाटत असली, तरी पक्षातील अंतर्गत मतभेद आणि बंडखोरीमुळे काँग्रेसमध्ये सध्या अस्वस्थ वातावरण आहे. जनविकास सेनेच्या ४ नगरसेवकांचा स्वतंत्र गट, तर शिवसेना-वंचित आघाडीच्या ८ नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी झाल्याने सत्तास्थापनेचे गणित अधिकच क्लिष्ट झाले आहे. दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक नंदू नागरकर आणि प्रशांत दानव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत कांग्रेसला धक्का दिला आणि तेच आता निर्णायक भूमिकेत असून त्यांना धानोरकर गट सोबत घ्यायला तयार नसल्याने त्यांनी उबाटा सोबत गट बनवून आपला पॉवर वाढवीला आहे. दरम्यान उबाटा सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी राजकीय परिपक्वता दाखवून उबाटा वंचित सोबत आता अपक्ष नगरसेवक नंदू नागरकर आणि प्रशांत दानव यांनी गटात उपस्थिती दाखवल्याने कांग्रेस च्या अंतर्गत गोटात शांतता पसरली आहे.
शिवसेना-वंचित-अपक्ष आघाडी भाजपला समर्थन देणार?
सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना-वंचित आघाडी सोबत आता दोन अपक्ष नगरसेवक नंदू नागरकर आणि प्रशांत दानव हे जुळले असल्याने हा गट किंग मेकर ठरत असल्याचे चित्र आहे आता या गटाला दोन अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्याने शिवसेना-वंचितकडे आता एकूण १० नगरसेवकांचे बळ आहे. महापौर निवडीसाठी हा आकडा अत्यंत निर्णायक मानला जात असून भाजपाच्या एकूण 24 मिळून हा आकडा 34 ची मॅजिक फिगर ओलांडू शकतं असल्याने भाजपला सत्ता स्थापन करण्यास मोठी संधी मिळाली आहे. दरम्यान शिवसेना -वंचित गटाच्या १० नगरसेवकांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांची भेट घेऊन चंद्रपूरच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे आणि वंचित आघाडीचे महानगर अध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सोबतच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा या गटाने भेट घेऊन महापौर पदावर आपला दावा भक्कम केला आहे.
‘एक कोटींची ऑफर’ – वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
काँग्रेस विधिमंडळ नेते यांनी चंद्रपुरात फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याची शक्यता जाहीरपणे मांडली आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी एका नगरसेवकाला पदासह तब्बल एक कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला.
“सत्ता स्थापनेसाठी पैसा आणि पदाच्या जोरावर जादू होणार का? अपक्ष नगरसेवक बळी पडणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस पक्षात तातडीची बैठक, अन जबाबदाऱ्या निश्चित
चंद्रपूर महापालिकेबाबत काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या गोंधळानंतर पक्षश्रेष्ठींची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
- गटनेता निवड – प्रदेशाध्यक्ष ठरवतील
- महापौर निवड – खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अखत्यारीत
- स्थायी समिती – विजय वडेट्टीवार निर्णय घेणार
महापालिकेत ज्यांचा पाठिंबा मिळेल, त्यांना उपमहापौरपद देण्याचा फॉर्म्युलाही या बैठकीत ठरवण्यात आला आहे.
‘महापौर भाजपचाच’ भाजप नेत्यांचा दावा खरा ठरणार?
कांग्रेस च्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महापौर कांग्रेसचाच होणार आणि तो आपल्याचं गटाचा होईल अशी गर्जना केली होती,, पण संख्याबळ त्यांना आता जुळवणे शक्य नसल्याचे राजकीय चित्र दिसत असल्याने भाजपने सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप नेते यांनी महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा केल्याने राजकीय तापमान आणखी वाढले आहे.
कांग्रेसचे सत्तेचे अंतिम गणित काय?
सध्याच्या चर्चेनुसार –
- महापौर : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा पसंतीचा उमेदवार
- स्थायी समिती सभापती : पुढील ५ वर्षे विजय वडेट्टीवार यांच्याकडे
- मित्रपक्ष : उपमहापौर व स्थायी समिती सदस्यत्व
मात्र, हे गणित प्रत्यक्षात उतरेल की नाही, हे सर्वस्वी शिवसेना-वंचित आघाडीच्या निर्णयावर अवलंबून आहे.
शेवटचा निष्कर्ष
चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी सुरू असलेली रस्सीखेच, संभाव्य फोडाफोडीचे आरोप, पैशांच्या ऑफरची चर्चा आणि किंगमेकरच्या भूमिकेत आलेली शिवसेना-वंचित आघाडी – यामुळे शहराचे राजकारण निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे.
खरा किंगमेकर कोण? महापौर कुणाचा? उपमहापौर कोण?
या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार असली, तरी सध्या तरी चंद्रपूरच्या राजकारणात सस्पेन्स कायम आहे. त्यात खासदार धानोरकर यांनी कांग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना आव्हान करून जी रिस्क घेतली ती त्यांच्या अंगलट येणार असून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मनावर घेतलं तर चंद्रपूर मनापात भाजपची सत्ता येईल यात दुम्मत असणारं नाही अशी स्थिती दिसत आहे.





