Home चंद्रपूर पिपरी (धानोरा) येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचे भक्तिमय वातावरणात भव्य आयोजन

पिपरी (धानोरा) येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचे भक्तिमय वातावरणात भव्य आयोजन

पिपरी (धानोरा) येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचे भक्तिमय वातावरणात भव्य आयोजन

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश दादापाटील चोखारे यांची उपस्थिती

 

पिपरी (धानोरा) :-  पारंपरिक श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक असलेल्या श्रीमद् भागवत सप्ताहाचे पिपरी (धानोरा) येथे अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्ताने गावासह परिसरात आध्यात्मिक चैतन्य पसरले असून, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

या भागवत सप्ताहात ह. भ. प. प्रभुजी वरडोळे महाराज यांच्या अमृतमयी वाणीतून भागवत कथा, कीर्तन व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिपरी (धानोरा) येथे भागवत सप्ताहाची परंपरा अखंड सुरू असून, त्यांच्या प्रभावी व प्रेरणादायी प्रवचनामुळे भाविकांना अध्यात्मिक समाधान व जीवनमूल्यांची दिशा मिळत आहे.

भागवत सप्ताहाच्या माध्यमातून धर्मसंस्कार, समाजप्रबोधन आणि अध्यात्मिक विचारांचा प्रसार होत असून, दररोज सकाळी व सायंकाळी भागवत कथा, हरिनाम जप, कीर्तन तसेच प्रवचन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह काळात संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हरिनामाच्या गजराने आणि कीर्तनाच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भागवत सप्ताह समिती सक्रियपणे कार्यरत आहे. समितीचे अध्यक्ष कैलास पानघाटे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष गोसाई तुराणकर, बबन मोहितकर, मारोती पिंपळकर, जनार्दन चिडे, तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष बापूराव येरगुडे, गणेश आवारी, रंगराव पवार, अतुल मोहितकर, अभय तुराणकर, दीपक अडवाले, शामसुंदर मूठ्रठलकर यांच्यासह गावातील सर्व युवक व माजी अध्यक्षांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
याशिवाय पिपरी (धानोरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशालीताई माथने, समस्त ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी संस्था पिपरी, गावातील सर्व भजन मंडळे तसेच माजी अध्यक्ष व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

दरम्यान, या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश दादापाटील चोखारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी भागवत सप्ताहास शुभेच्छा देत, असे धार्मिक कार्यक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन, नैतिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत व्यक्त केले.

भागवत सप्ताहाच्या माध्यमातून संस्कृती जपणूक, सामाजिक ऐक्य आणि नव्या पिढीमध्ये धार्मिक व नैतिक मूल्यांची रुजवण होत असल्याचे आयोजकांनी नमूद केले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भागवत कथांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भागवत सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.