Home महाराष्ट्र सावधान ! महिन्या दोन महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता CM ठाकरे यांनी...

सावधान ! महिन्या दोन महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता CM ठाकरे यांनी दिल्या ‘या’ सूचना.

 

तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढू शकते, टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी केले भाकीत

मुंबई न्यूज नेटवर्क:-

अकस्मात आलेल्या मागील दुसऱ्या लाटेत सरकारने पाहिजे त्या प्रमाणात रुग्णसंख्या सुरुवातीला आटोक्यात आणली नसल्याने सरकारच्या आरोग्य विभागाची पुरती वाट लागली होती व काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. त्यामुळे करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पावले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यकती औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.टास्क फोर्स मधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे, असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

पहिल्या लाटेच्या वेळेस आपल्याकडे सुविधांची कमी होती, त्यात आपण वाढ करीत गेलो. दुसऱ्या लाटेने देखील आपल्याला बरेच काही शिकविले. ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स, ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ऑगस्ट-सप्टेंबर पासून देशाला ४२ कोटी लसी मिळतील, अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरू होऊन महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. लसीकरण हा या लढाईत महत्त्वाचा भाग असला तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे अत्यावश्यकच आहे. या बैठकीत पुढच्या काळात लागणारी संभाव्य औषधे, त्यांची खरेदी, त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, आरटीपीसीआर किट, मास्क, पीपीई किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सर्व सबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही सांगितले.

तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू शकते.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्णसंख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस व्हेरीयंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्णसंख्या परत दुपटीने वाढू शकते. पहिल्या लाटेत १९ लाख रुग्ण होते, दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाखापेक्षा जास्त झाली होती. सक्रिय रुग्णांची संख्याही ८ लाख होऊ शकते तसेच १० टक्यांच्या आसपास संसर्गग्रस्त मुलांची संख्या असू शकते असे आरोग्य विभागाने सादरीकरणात सांगितले. १७ सप्टेंबर २०२० रोजी पहिल्या लाटेत सर्वाधिक म्हणजे ३ लाख १ हजार ७५२ रुग्ण होते. तर २२ एप्रिल २०२१ रोजी दुसऱ्या लाटेत सर्वोच्च रुग्णसंख्या ६ लाख ९९ हजार ८५८ होती. १३ सप्टेंबर २०२० रोजी सर्वांधिक ५१७ मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत २६ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक १११० मृत्यू झाले. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक म्हणजे २३.५३ टक्के होती तर दुसऱ्या लाटेत ८ एप्रिल २०२१ रोजी २४.९६ टक्के पॉझिटीव्हिटी दर होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली. ब्रिटन व इतर काही देशांत परत विषाणूचा संसर्ग वाढून निर्बंध कडक करण्याची वेळ येते आहे, याकडेही टास्क फोर्सने लक्ष वेधले.