Home Breaking News सनसनीखेज :- मजूर सहकारी संस्थांमध्ये बोगस मजूर दाखवून कोट्यावधींचा घोटाळा?

सनसनीखेज :- मजूर सहकारी संस्थांमध्ये बोगस मजूर दाखवून कोट्यावधींचा घोटाळा?

माहिती अधिकारातून होणार मोठा उलगडा, ते श्रीमंत मजूर कोण याबाबतचा संभ्रम दूर होणार.

चंद्रपूर :-

जिल्ह्यातील काही मजूर सहकारी संस्थांमध्ये बोगस मजूर दाखवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी लावला होता, दरम्यान या प्रकरणाची चौकशी स्थानीय जिल्हा उपनिबंधक यांनी करणे अभिप्रेत होते, मात्र त्यांनी आपले हात झटकून तक्रारकर्त्यालाच पुरावे मागितले, दरम्यान या प्रकरणात काही तहसीलदारांकडून मजूर असल्याचे बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून आता माहिती अधिकाराच्या माध्यमातून याची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मजूर कोण आणि कागदोपत्री मजूर कोण, याचा मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक मजूर सहकारी संस्थांमध्ये प्रत्यक्षात मजुरी न करणाऱ्या व्यक्तींना मजूर म्हणून दाखवण्यात आले आहे. या बोगस मजुरांच्या नावावर सरकारी कामे घेऊन मोठ्या प्रमाणात निधी उचलल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात काही तहसीलदारांनी संबंधित व्यक्तींना मजूर असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने संशय अधिकच बळावला आहे. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय यांच्यावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण मजूर सहकारी संस्थांना विविध सरकारी कामांचे वाटप जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून केले जाते. मात्र, कामे देताना त्या संस्थांमधील मजूर खरोखरच पात्र आहेत का, याची शहानिशा केली जाते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हा उपनिबंधक जयंसिंग ठाकूर यांना निवेदन देऊन सविस्तर तक्रार करण्यात आली होती . तरीही अद्याप या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तक्रार देऊनही कारवाई का होत नाही, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे माहिती अधिकारातून तहसीलदार कार्यालयाकडून मजूर प्रमाणपत्रांची माहिती मागविण्यात आली असून, त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर या प्रकरणात बोगस मजूर आणि बोगस प्रमाणपत्रांचा प्रकार उघड झाला, तर संबंधित अधिकारी आणि संस्थांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून आणि विविध संघटनांकडून होत आहे. माहिती अधिकारातून पुढे येणाऱ्या माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणाचा खरा चेहरा लवकरच समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.