वनविभागाची आवश्यक परवानगी न घेता मोबाईल कॅमेऱ्याने व्हिडिओ चित्रीकरण भोवले…..
चंद्रपूर :–
जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ Tadoba Andhari Tiger Reserve येथे पर्यटनासाठी गेलेल्या आमदार करण देवतळे यांच्यावर वन कायाद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वनविभागाने 5 हजार रुपयांचा दंड आकारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
माहितीनुसार, आमदार करण देवतळे ताडोबा येथे जंगल सफारीसाठी गेले होते. सफारीदरम्यान त्यांनी वनविभागाची आवश्यक परवानगी न घेता मोबाईल कॅमेऱ्याने व्हिडिओ चित्रीकरण केले आणि त्यावरून सोशल मीडियासाठी रील तयार केली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात नियमांनुसार विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग किंवा व्यावसायिक स्वरूपाचे चित्रीकरण करणे मनाई आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार करण देवतळे यांच्यावर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वनक्षेत्रातील वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन हे नियम कडकपणे पाळणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, एका लोकप्रतिनिधीनेच नियम मोडल्याने या घटनेवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. सामान्य नागरिकांनी नियम पाळावेत असे आवाहन केले जाते, परंतु लोकप्रतिनिधींनाच कायदा मोडण्याचे अधिकार कोणी दिले? असा सवालही अनेक पर्यटक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा देशातील महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक मानला जातो. येथे दरवर्षी हजारो पर्यटक जंगल सफारीसाठी येतात. त्यामुळे येथे लागू असलेले नियम सर्वांसाठी समान आहेत, मग तो सामान्य पर्यटक असो किंवा लोकप्रतिनिधी, असेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.




