
निष्ठेला न्याय नाही, म्हणून आता संघर्षाचा मार्ग… अन्यायाविरोधात अपक्ष रणांगणात उतरण्याचा रवी जोगी यांचा निर्धार
चंद्रपूर :- “२०१२ पासून राजकीय पक्षातील लोकशाहीविरोधी भूमिकेमुळे माझ्यावर सातत्याने अन्याय होत आहे. या अन्यायाला जनता मतदानाच्या माध्यमातून निश्चित उत्तर देईल,” असा ठाम विश्वास व्यक्त करत वडगाव प्रभागातील निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्ते रवी जोगी यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जशा जवळ येतात, तसाच मधील एक ठरावीक पॅटर्न वडगाव प्रभागात पुन्हा-पुन्हा दिसून येतो. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलायचे आणि ऐनवेळी पक्षात आलेल्यांना AB फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे — हा प्रकार गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून सुरू असल्याचा आरोप रवी जोगी यांनी केला आहे.
याच धोरणाचा परिणाम म्हणून, पक्षाचे स्थानिक आमदार व पालकमंत्री असतानाही वडगाव प्रभागात भाजपला दोन नगरसेवकांच्या पुढे मजल मारता आली नाही, ही वस्तुस्थितीही त्यांनी अधोरेखित केली.
२५ वर्षांची निष्ठा, तरीही डावलणूक
रवी जोगी हे वडगाव प्रभागातील रहिवासी असून गेल्या अडीच दशकांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. माजी केंद्रीय मंत्री यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. सध्या ते सिव्हिल प्रभाग मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.
२०१२ मध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीत नगरसेवक पदासाठी संधी मिळाली, तेव्हा शिवसेनेतून भाजपात आयात झालेल्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले आणि रवी जोगी यांना थांबवण्यात आले. २०१७ मध्येही अशीच पुनरावृत्ती झाली.
२०२५-२६ मध्ये यावेळी तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा AB फॉर्मच्या गोंधळात त्यांच्यावर अन्याय झाल्याचे रवी जोगी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. या गोंधळात अधिकृत उमेदवार वेगळाच ठरला आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना अपक्ष राहण्याची वेळ आली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“निष्ठेची किंमत कुचंबणा असेल तर…?”
तीन-तीन वेळा अन्याय सहन करूनही प्रत्येक वेळी थांबायचे का?
सामान्य घरातील युवकांनी पक्षासाठी अहोरात्र काम करूनही केवळ उपेक्षा आणि कुचंबणाच सहन करायची का?
राजकीय क्षेत्रात सामान्य कार्यकर्त्यांनी मोठे होऊच नये का?
असे प्रश्न स्वतःला पडू लागल्यानंतरच अपक्ष राहण्याचा निर्णय घेतल्याचे रवी जोगी यांनी सांगितले. विशेष म्हणजे, वडगाव प्रभागातील तळागाळातील नागरिकांनीही “यावेळी थांबू नका, लढा” असा सल्ला दिल्याने त्यांचा निर्धार अधिक पक्का झाला.
नाव नव्हे, काम आणि माणूस महत्त्वाचा
प्रभागात अनेक अपक्ष उमेदवार आहेत. काहींकडे पक्षाचे चिन्ह नाही, तरीही ते जनतेच्या विश्वासावर उभे आहेत. त्यामुळे चिन्ह महत्त्वाचे नसून व्यक्ती, त्याचे काम आणि विचार महत्त्वाचे असल्याचे मत रवी जोगी यांनी ठामपणे मांडले.
निष्ठावंत, ज्येष्ठ आणि जनतेच्या मनात घर केलेला कार्यकर्ता
रवी जोगी हे केवळ पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नाहीत, तर नागरिकांच्या मनामनात व हृदयात स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कामाला आणि विचारांना शब्द अपुरे पडावेत, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. पक्षासाठीच नव्हे तर नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
“आता जनतेने या सर्व प्रकाराचा विचार करावा. अन्यायाविरोधात माझा आवाज बुलंद करावा आणि अन्याय करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी,” असे आवाहन करत रवी जोगी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.





