नवरा बायकोच्या वादात एकाचा जीव गेला तर तीन जण जखमी, दुर्गापूर परिसर हादरला.
चंद्रपूर (अतुल दिघाडे):-
किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद गुरुवारी दुपारी थेट एका थरारक हत्याकांडात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना दुर्गापूर परिसरात घडली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये कमालीची दहशत पाहायला मिळाली आहे, दरम्यान प्रत्यक्षदर्शीने हा हत्तेचा थरार मोबाईल कैमेरात घेतला असल्याची माहिती आहे.
मृत तरुणाची ओळख यश हरिदास फाले (वय २५, रा. कोंडी वॉर्ड नं. ५, दुर्गापूर) अशी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रफुल महाराणे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत.
*वादाची पार्श्वभूमी*
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत यश फाले आणि आरोपी प्रफुल महाराणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. आरोपी प्रफुल हा कोयना गेट परिसरात नाश्ता व लस्सीचे दुकान चालवतो. विशेष म्हणजे, आरोपीची पत्नी जवळपास नऊ-दहा महिन्यांनंतर नुकतीच घरी परतल्याने घरगुती तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवरच दोघांमधील वाद चिघळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
*भररस्त्यात रक्तरंजित हल्ला*
गुरुवारी दुपारी सुमारे ०३.०० ते ०३.३० वाजताच्या सुमारास यश फाले आणि त्याचे दोन साथीदार आरोपीच्या दुकानात आले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला; मात्र काही वेळातच हा वाद हिंसक स्वरूप धारण करू लागला. मिळालेल्या माहितीनुसार, यश आणि त्याच्या साथीदारांनी आरोपीवर काचेच्या बाटल्या व ग्लास फोडून हल्ला केला, ज्यात आरोपी गंभीर जखमी झाला.
स्वतःचा बचाव करण्याच्या उद्देशाने आरोपी प्रफुलने दुकानात वापरली जाणारी बर्फ फोडण्याची धारदार ‘नोकुली’ (सुया) हातात घेतली आणि तिघांवर सपासप वार केले. या हल्ल्यात यश फालेच्या पोटावर दोन घाव आणि पाठीवर गंभीर घाव बसला. वार इतके भीषण होते की, तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
याशिवाय, यशच्या दोन साथीदारांनाही गंभीर दुखापती झाल्या असून, एकाच्या छातीवर तर दुसऱ्याच्या पायावर जखमा झाल्याची माहिती आहे.
*पोलिसांची तातडीची कारवाई*
घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलीस अधीक्षक गौरव कायदेपंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह पोस्टमार्टम तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
*परिसरात भीतीचे सावट*
या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ कारणांवरून वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि कायद्याचा कमी होत चाललेला धाक याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे स्थानिकांमध्ये सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
*कठोर कारवाईची मागणी*
या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडूनही या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करून सत्य समोर आणण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
दरम्यान, ही घटना केवळ वैयक्तिक वादातून घडली की यामागे आणखी काही कारणे आहेत, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.




