नागपूर येथे WCL चे CMD यांची भेट; घुघुस येथील लोखंडी पुलासाठी अतिरिक्त १ कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी तातडीने मंजूर
घुघुस :- घुघुस शहरातील अत्यंत महत्त्वाचा लोखंडी पूल गेल्या दोन वर्षांपासून रहदारीसाठी बंद असल्यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व कामगार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पर्यायी मार्गांवरून होणारी वाहतूक, वाढलेला वेळ, आर्थिक नुकसान तसेच अपघातांची भीती यामुळे शहरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
News reporter :- अतुल दिघाडे
या पार्श्वभूमीवर आज नागपूर येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) चे CMD मा. श्री. जय प्रकाश द्विवेदी यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान घुघुस येथील लोखंडी पुलाच्या कामाबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. पुलाच्या सद्यस्थितीमुळे निर्माण झालेल्या नागरिकांच्या अडचणी, वाहतूक कोंडी, व्यापारी नुकसान आणि शहराच्या विकासावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती CMD यांच्यासमोर मांडण्यात आली.
या चर्चेनंतर घुघुस लोखंडी पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी अतिरिक्त १ कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, हा निधी उद्याच वर्ग केला जाणार असल्याचे CMD श्री. जय प्रकाश द्विवेदी यांनी स्पष्टपणे सांगितले.
यापूर्वी या पुलाच्या कामासाठी ३ कोटी ७७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष कामाच्या अंदाजानुसार हा निधी अपुरा ठरत होता. त्यामुळे काम रखडले होते आणि पुलाचे पुनर्बांधकाम वेळेत पूर्ण होऊ शकले नव्हते. आता अतिरिक्त निधी मंजूर झाल्याने कामाला आवश्यक गती मिळणार असून पुलाचे काम लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे घुघुस शहरातील नागरिक, व्यापारी वर्ग आणि वाहनचालकांमध्ये समाधान व दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार असून बाजारपेठ, शाळा–महाविद्यालये आणि औद्योगिक भागाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
या भेटीदरम्यान WCL चे डायरेक्टर (HR) मा. डॉ. हेमंत पांडे, तसेच WCL HMC चे प्रेसिडेंट श्री. शिवकुमार यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. संबंधित अधिकाऱ्यांनीही पुलाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
एकूणच, नागपूर येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे घुघुस शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले असून, दोन वर्षांपासून बंद असलेल्या लोखंडी पुलाच्या प्रश्नावर निर्णायक तोडगा निघाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.





