चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचा उपवर युवक–युवती परिचय मेळावा उत्साहात संपन्न
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित उपवर युवक–युवती परिचय मेळावा दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी जतिरामजी बर्वे सभागृह, एकलव्य मुलांचे वसतिगृहासमोर, मुल रोड, चंद्रपूर येथे उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
News reporter :- अतुल दिघाडे
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मा. कृष्णाजी नागपुरे, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ, चंद्रपूर होते. तर उद्घाटक म्हणून मा. किशोरभाऊ जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांनी उपस्थित राहून समाजहित व युवकांच्या प्रगतीसंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. चंद्रलालजी मेश्राम (निवृत्त न्यायाधीश तथा माजी सदस्य, मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र राज्य), मा. गजाननराव कामडे (सरचिटणीस, भू-विज्ञान व खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर) व मा. शालूताई कोल्हे (तलाव वाचवणारी निसर्ग कन्या, निमगाव, जि. गोंदिया) उपस्थित होते. समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक, विविध शाखांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवाहयोग्य युवक–युवतींना परस्पर परिचयाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, वधू–वर शोध प्रक्रियेत सुलभता आणणे तसेच समाजातील एकोपा व संघटनबळ वृद्धिंगत करणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. हा उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाल्याचे आयोजकांनी नमूद केले.
मेळाव्याच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये विवाह जुळणाऱ्या जोडप्यांसाठी मोफत विवाह व्यवस्थेची सुविधा, मेळाव्यातच ५ विवाह यशस्वीरीत्या पार पडणे, युवक–युवतींसाठी स्वतंत्र परिचय कक्ष, ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी व्यवस्था तसेच पारदर्शक व शिस्तबद्ध नियोजन यांचा समावेश होता.
या प्रसंगी झालेल्या आर्थिक सहकार्यात आ. किशोरभाऊ जोरगेवार यांनी विविध विकास कामांसाठी ₹५० लाख निधी जाहीर केला, प्रा. डॉ. राजेश डाहारे, उपाध्यक्ष यांनी सोलर एनर्जी यंत्रासाठी ₹३ लाख, तर मा. कृष्णाजी नागपुरे यांनी एकलव्य पुतळा उभारणीसाठी ₹१ लाख निधी जाहीर केल्याने समाजबांधवांत समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री. अविनाश पोईनकर (कवितेची विद्यापीठ सत्रात निवड), श्री. गोपाल शिरपूरकर (उत्कृष्ट लेखन), अँड. मनोजकुमार पारशिवे (भारत सरकार नोटरी नियुक्ती), श्री. अशोक गर्गेलवार (आपत्ती व्यवस्थापनांतर्गत उत्कृष्ट बचाव कार्य), श्री. मारोतराव कापटे (गुरुकुंज भोसरी सहायक पदी नियुक्ती) व श्री. नंदुभाऊ पढाल (उपाध्यक्ष, विदर्भ मच्छीमार संघ) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अविनाश पोईनकर व अँड. मनोज पारशिवे यांनी केले. आभार प्रदर्शन इंजी. गुलाबराव गेडाम, संघटन सचिव यांनी केले. उपस्थितांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या मेळाव्यास उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पालकवर्ग, युवक–युवती, स्वयंसेवक, महिला व समाजबांधवांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.





