अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामागील उदय मोहल्ला परिसरात एका भावानेच आपल्याच भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 7 ऑगस्ट रोजी रात्री 10 च्या सुमारास गणेश पुंडलिक गेडाम हे घरी जेवत असताना त्यांचा भाऊ मंगल पुंडलिक गेडाम हा मद्यधुंद अवस्थेत आला.
मंगलने गणेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने भांडणाचे पर्यवसान शारिरीक मारामारीत झाले. बाचाबाची दरम्यान मंगलने कुऱ्हाडीने पकडून गणेशच्या मानेवर व डोक्यावर वार केले, त्यामुळे तो खाली पडला. शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करूनही गणेशचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी आरोपी मंगल गेडाम याला तात्काळ अटक केली. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.




