विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी, त्यात किती दर्दी? पैसा आहे म्हणून निवडणूक लढावायची पण व्हिजनचे काय?
लक्षवेधी :-
निवडनुका आल्या की काही राजकीय पावसाळी बेडकं बाहेर निघून डरकाळ्या फोडतात, पण बाकी दिवस हे करतात काय? याचा मात्र शोध भल्याभल्यांना लागला नाही, कारण या राजकीय संधीसाधू लोकांना जनतेचं काहीही घेणदेणं नसतं “भाडं मे जाये जनता अपना काम बनता.” असं यांचं ध्येय, निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी हे छत्र्या वाटतील, रेनकोट वाटतील नाहीतर म्हाताऱ्यांना चष्मे वाटप करतील पण जनतेवर जेंव्हा अन्याय होतो तेंव्हा मात्र हे शेपूट गुंडाळून घरात बसतात आणि प्रशासनाला दोष देऊन मोकळे होतात, कारण यांना बाकीच्या भानगडीत पडायचं नसतं. दरम्यान जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदार संघात असेच राजकीय पावसाळी बेडकं गरगरा गावागावात जाऊन ज्या पद्धतीने साहित्य वाटप करून लोकांना माझ्याकडे लक्ष ठेवा असे आवाहन करत आहे, त्या आवाहनाला जनता बळी पडेल का, की त्यांची बोळवन करणार? याबद्दल तर्कवितर्क लावल्या जातं आहे, पण निवडणूकीच्या तोंडावर जे संभावित उमेदवार मतदारांना भुरळ पाडण्यासाठी छत्री वाटप, स्वतःच्या नावाने टी शर्ट, बनियान, रेनकोट, चष्मे वाटप करून जनतेत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत ते क्षणिक आणि स्वार्थी राजकारण आहे हे आता जनतेला सुद्धा कळायला लागलं आहे, निवडणूकीच्या तोंडावर साहित्य वाटप करणं लोकशाहीत बसणारे नसून मतदारांना आमिष दाखवून त्यांच्या मतदानाची एक प्रकारे लूट आहे, कारण राजकारणातील अनेक नेते कार्यकर्ते जनतेच्या हक्क अधिकारासाठी वर्षेगणित संघर्ष करतात त्यांचा संघर्ष जनतेच्या भल्यासाठी असतो पण क्षणिक वेळी येऊन पैसे व साहित्य वाटप करीत मतदान आपल्या बाजूने वळवणे म्हणजे लोकांचे अधिकार संपुष्ठात आणणे होय आणि हे जो कुणी करत आहे ते येणाऱ्या पिढीला बर्बाद करताहेत.
खरं म्हणजे काही राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते जनतेच्या हक्क अधिकारासाठी कुठलाही आर्थिक मोबदला न घेता सेवा देतात, त्यांच्या त्या सेवेला सुद्धा हे आयाराम गयाराम छेद देत आहे. समाजकारनातून जो संघर्ष असतो तो केवळ महिना दोन महिन्यांचा नसतो तर सैदव सुरू असतो आणि त्यातूनचं गावातील तळागळात घराघरात जनतेशी संबंध तयार होते, त्यातून राजनेता तयार होतो, आजकाल जो तो जणू राजनेता झाल्यासारखा सामाजिक माध्यमावर वावरत आहे व त्याला दिवसाढवळ्या आमदार झाल्यासारखं वाटतंय हे लोकशाहीला बाधक आहे, कारण जो कार्यकर्ता पक्षाच्या संघटन वाढीसाठी व जनतेच्या हक्क अधिकारासाठी संघर्ष करतो प्रसंगी त्यांचेवर हल्ले होतात त्यांना कारागृहात जावे लागते, मात्र त्याच्याकडे पैसे नाही म्हणुन राजकीय पक्ष त्या संघर्षशील कार्यकर्त्याला उमेदवारी न देता बाहेरील पक्षातील किंव्हा धनवान व्यक्तीला उमेदवारी देतात ही वस्तुस्थिती आहे, याविषयी जनतेने त्यांना पाठबळ देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे तरच वेळेवर आमदारकीचे डोहाळे लागलेले आयाराम गयाराम थडीला पडतील. पण आमदार बनण्याची योग्यता नसताना केवळ पैसा आहे म्हणून ज्या लोकांना उमेदवारी मिळते ते जनतेची सेवा करणारं की विकासाची वाट लावणार? हे जनतेने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यांच्याकडे व्हिजन आहे शहराचा गावाचा विकास करण्याची दूरदृष्टी आहे अशा नेत्याला व कार्यकर्त्यांना जनतेने निवडून द्यावे कारण जनतेच्या एका चुकीच्या निर्णयाने लोकशाही धोक्यातयेऊ शकते ज्याची झळ जनतेला बसत असतें.
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात तर संभावित उमेदवरांचा जणू पूर आला आहे, जो तो आपल्यालाच संधी असल्याचे राजकीय समीकरणे जुळवून मतदारांना आवाहन करत आहे की मत मलाच द्या, पण यांना मत द्यायचं कशासाठी? हे मात्र जनता त्यांना सवाल करत नाही म्हणुन जो तो आपल्या छत्र्या घेऊन, रेनकोट घेऊन तर कुणी चष्मे घेऊन गावागावात मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी साहित्य वाटपाचा तमाशा चालवत आहे, पण यांना यावेळीच जनतेला साहित्य वाटप करण्याचा पुळका का आलाय? याचं गणित मात्र त्यांनाच माहीत आहे, यामध्ये काही संभावित उमेदवार तर असे आहे की कुणीतरी त्यांना हुसकावून दिलंय की साहेब तुम्ही यावेळी आमदार झालाच म्हणुन समजा, त्यामुळे आमदारकीचे डोहाळे लागलेले अनेक हौसे नवसे गवसे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार होण्याचे स्वप्नं बघत आहे, पण जी माणसे एखाद्या अमिषाला बळी पडून मतदान करतात मुळात ती गुलामागिरी स्वीकारतात आणि या विधानसभा क्षेत्रातील जनतेने हे आजमावलं आहे आणि म्हणुन निकोप स्वछ राजकारण करून जनतेच्या हक्क अधिकारासाठी लढणाऱ्या लढवंय्या नेत्याला जनतेने डोक्यावर घेणं हेच खरं लोकशाहीच चित्र दिसायला हवं.
तरच ते आयाराम गयाराम श्रीमंत पडतील?
काही राजकारणी यांना मतदार संघाचा भूगोल आणि इतिहास माहीत नसतो, पण जनतेची मते विकत घेऊन जिंकून यायचा अभ्यास मात्र यांना माहीत असतो, कारण त्यांना माहीत असतं की ही माणसं जाणारं कुठं? त्यांना पैशाचं आणि साहित्याच अमिश दाखवलं की ते येतील आपल्याकडे पण हेचं लोकं आमदार खासदार होतात तेंव्हा जर सर्वसामान्य जनतेवर संकट आलं की मग हे लोकप्रतिनिधी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे नसतात, नव्हे उलट त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि मग सर्वसामान्य माणसाला कळतं की आपण चुकीच्या माणसाला निवडून दिलं, खरं तर पैसे घेऊन मतदान करणारी माणसं या लोकशाही मध्ये जोपर्यंत असेल तोपर्यंत श्रीमंत आणि चोर बदमाश गुंड हेच निवडून येथील आणि सर्वसामान्य जनतेचं काम करणारा कार्यकर्ता कधीही निवडून येणार नाही, मग श्रीमंत निवडून आला की वाटलेला पैसा ते रस्ता बांधकामातून आणि आणखी विकास कामातून कामावेल आणि मग कामाचा दर्जा काय असेल तर आज रस्ता बनला उद्या उखडला हीच परिस्थिती राहणार आहे हे साधं लाजिक आजपर्यंत आपल्या मतदारांना कळालं नाही, त्यामुळं यावेळी मतदारांनी एक विचार करायला हवा की माझ्या कामासाठी कोण धावून येईल व गावाचा, शहराचा विकास कोण करू शकतो या गोष्टी समोर ठेऊन मतदान करावं त्यावेळी निश्चितपणे आयाराम गयाराम श्रीमंत पडेल आणि होतकरू उमेदवार निवडून येईल जो खरोखर जनतेची कामे करू शकतो, मग कुणाची छत्री रेनकोट किंव्हा चष्मे घेऊन लाचार होण्याची वेळ जनतेवर येणार नाही एवढे मात्र निश्चित.




