Home चंद्रपूर नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज ६ डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट...

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज ६ डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार ६ डिसेंबर २०२३ रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, ०६ डिसेंबर रोजी जिल्ह्यात बहुदा सर्वत्र हल्का ते मध्यम पाऊस पडण्याची संभावना असून एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळ वेग (३० ते ४० किमी प्रतितास) होण्याची शक्यता वर्तविली आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी घ्यावी काळजी संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दूर रहावे. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साचते अशा भागातुन जाणे टाळावे. खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा.

पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका. पाणी दिसते त्यापेक्षा खोल आणि मजबुत असु शकते आणि त्यात मोडतोड तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू, भांडे, छिद्र किंवा विजेच्या तारा असु शकतात. पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर रहा. फ्लॅश पुर चेतावणी किंवा विजेच्या तारांपासून दूर रहा.

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करु नये विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असल्यास त्या वस्तू त्वरीत बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका, विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका, धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.