Home Breaking News एकत्र जगले, एकत्र निघाले… आणि एकत्रच काळाच्या पडद्याआड गेले पाच मित्र

एकत्र जगले, एकत्र निघाले… आणि एकत्रच काळाच्या पडद्याआड गेले पाच मित्र

एकत्र जगले, एकत्र निघाले… आणि एकत्रच काळाच्या पडद्याआड गेले पाच मित्र

घुग्घुसवर दुःखाचा डोंगर : बेलोरा घाटावर पाच युवकांचा दुर्दैवी अंत

घुग्घुस :-  सोमवारचा दिवस संपूर्ण घुग्घुस शहरासाठी काळाकुट्ट ठरला. इंदिरा नगर परिसरातील पाच जिगरी मित्र आनंदाने घराबाहेर पडले, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. वर्धा नदीच्या बेलोरा घाटावर अंघोळीसाठी गेलेल्या या पाच युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरले असून पाच कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

या दुर्दैवी घटनेत तन्मय पाथडे (१७), सनी असमपेली (१८), समय सोनटक्के (१७), रोहित बोबडे (१९) आणि नकुल केलजलकर (१८) या युवकांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी हे सर्व मित्र घरातून बाहेर पडले होते. मात्र ते वर्धा नदीवर जात असल्याची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली नव्हती.

संध्याकाळपर्यंत युवक घरी न परतल्याने कुटुंबियांची चिंता वाढू लागली. मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे फोन बंद आढळले. नातेवाईकांनी मित्रमंडळी व परिसरात शोधाशोध सुरू केली. दरम्यान, काही नागरिकांनी या युवकांना वर्धा नदीच्या दिशेने जाताना पाहिल्याची माहिती दिली.

त्यानंतर बेलोरा घाटावर पोहोचलेल्या कुटुंबियांना किनाऱ्यावर पडलेले कपडे, मोबाईल फोन आणि चप्पल दिसताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अनर्थाची भीती खरी ठरताच परिसरात एकच हळहळ पसरली. शोधमोहीम राबविण्यात आली आणि अखेर पाचही युवकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

एकत्र वाढलेले, एकत्र खेळलेले आणि भविष्यातील अनेक स्वप्ने डोळ्यांत साठवलेले हे पाच मित्र एकाच वेळी काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण घुग्घुस शहर शोकसागरात बुडाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून या पाच युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.