Home Breaking News वडगाव प्रभागातील नालासफाईचा गोंधळ; रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे, नागरिक त्रस्त

वडगाव प्रभागातील नालासफाईचा गोंधळ; रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे, नागरिक त्रस्त

वडगाव प्रभागातील नालासफाईचा गोंधळ; रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे, नागरिक त्रस्त

नालासफाईचे काम सुरू असले तरी कचरा उचलण्यास विलंब; अधिकारी व नगरसेवकांच्या दुर्लक्षाचा आरोप

चंद्रपूर :- पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे काम महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी वडगाव प्रभागात याचे वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. नालासफाईचे काम सुरू असले तरी नाल्यातून काढण्यात आलेला कचरा अनेक दिवसांपासून मुख्य रहदारीच्या रस्त्यावरच पडून असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या नाल्याची साफसफाई पूर्वी ५ ते ७ दिवसांत पूर्ण होत होती, त्या नाल्याच्या कामाला यंदा ८ ते १० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मनपाच्या कामकाजाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

विशेष म्हणजे, नाल्यातून काढलेला गाळ व कचरा वस्तीतील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर टाकण्यात आला असून तो गेल्या ४ ते ५ दिवसांपासून तसाच पडून आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, कचरा कधी उचलला जाणार याबाबत कामगारांना विचारणा केल्यास “आज उचलला जाईल”, “उद्या उचलू”, “संध्याकाळपर्यंत साफ होईल” अशी उत्तरे दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात कचरा जागेवरच असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.

नालासफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी ना संबंधित अधिकारी दिसत आहेत, ना लोकप्रतिनिधी. प्रभागात नगरसेवक असतानाही त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कामाच्या दर्जावर आणि नियोजनावर देखरेख नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरू नये म्हणून मनपा नालासफाई करत आहे, ही बाब स्वागतार्ह असली तरी त्यातून निघालेला कचरा दिवसन्-दिवस रस्त्यावर पडून ठेवणे योग्य नसल्याचे नागरिकांचे मत आहे. एकीकडे पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना दुसरीकडे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र वडगाव प्रभागात पाहायला मिळत आहे.

नालासफाईचे काम तातडीने पूर्ण करून रस्त्यावर पडलेला कचरा हटवावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.