३६० पदांच्या भरतीप्रकरणी होणार सणसनीखेज खुलासे; कोट्यवधींच्या व्यवहारांचे पुरावे समोर येण्याची शक्यता
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील ३६० पदांच्या नोकरभरती प्रकरणाने आता अत्यंत धक्कादायक वळण घेतले असून, या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार, राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप पुढे येत आहेत. या संपूर्ण प्रकरणात अनेक संचालक, तत्कालीन पदाधिकारी, बँकेचे अधिकारी तसेच परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीने या भरती घोटाळ्याबाबत मोठे पुरावे आणि धक्कादायक माहिती समोर आणण्याची तयारी सुरू केली असून, येत्या काळात या प्रकरणात अनेक मोठी नावे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तो माजी संचालक चौकशीच्या घेऱ्यात?
सूत्रांच्या माहितीनुसार, काही संचालकांनी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रुपये घेतल्याचे आरोप आहेत. मात्र अनेक उमेदवारांना पैसे देऊनही नोकरी मिळाली नसल्याने संबंधित संचालक अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे, एका माजी संचालकाने स्वतःच्या हस्ताक्षरात तयार केलेली उमेदवारांची यादी समोर आल्याचा दावा करण्यात येत असून, त्या यादीतील दोन उमेदवारांना प्रत्यक्षात नोकरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाला असून तो संचालक चौकशीच्या घेऱ्यात अडकणार असल्याचे चिन्ह दिसतं आहे.
तत्कालीन अध्यक्ष यांच्या निवडणूकीतील खर्चा बाबत खुलासे होणार?
सिडीसीसी बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या विधानसभा निवडणुकीसाठी नोकरभरतीतून जमा झालेला पैसा वापरण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. या संदर्भात कोट्यवधी रुपयांची रोकड बँकेतील मशीनद्वारे मोजण्यात आल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे. या व्यवहारांचे पुरावे समितीकडे उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, एका प्रिंटिंग प्रेसमार्फत निवडणुकीतील पोस्टर आणि बॅनरचे खर्च बँकेच्या खात्यात दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचेही उघड झाल्याची चर्चा आहे. संबंधित व्यवहारांचे दस्तऐवजी पुरावे समोर आल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे
तीन आमदारांच्या सदस्यीय समितीपुढे पुरावे होणार सादर
आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती लवकरच राज्य शासनाने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय आमदार समितीकडे हे सर्व पुरावे सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पैसे देऊनही नोकरी न मिळालेल्या अनेक उमेदवारांची मोठी बैठक आयोजित करण्यात येणार असून, या पीडित उमेदवारांचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात तत्कालीन संचालक मंडळ, बँकेचे तत्कालीन सीईओ कल्याणकर तसेच परीक्षा प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. हुशार आणि पात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट मंडळींविरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीने दिला आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




