वाहतूक अडथळे व वाढत्या उष्णतेवर उपाययोजनांसाठी युवा नेता सोहम बुटले यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
वडगाव प्रभागातील समस्या, वाहतूक कोंडी व नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
चंद्रपूर :- शहरातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून वाहतूक अडथळ्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर युवा नेता सोहम किरण सुदर्शन बुटले यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना सविस्तर निवेदन देत विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
News reporter :- अतुल दिघाडे
यावेळी त्यांनी वडगाव प्रभागातील विविध नागरी समस्या, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, अपघातप्रवण ठिकाणे तसेच नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा केली. शहरात तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात उष्माघात, डिहायड्रेशन, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
सोहम बुटले यांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये वर्दळीच्या प्रमाणानुसार अत्याधुनिक वॉटर फॉगिंग मशीन बसविण्याची मागणी केली. विशेषतः ज्या भागांमध्ये नागरिक व वाहनांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी प्रभावी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी जटपुरा गेट परिसरात बसविण्यात आलेली फॉगिंग व्यवस्था प्रभावी ठरली नसल्याने यावेळी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच शहरातील प्रत्येक प्रमुख चौक, बसथांबे व सार्वजनिक ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची पाणपोई उभारण्यात यावी, पाण्याची गुणवत्ता नियमित तपासण्यात यावी आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ग्रीन मॅट, शेड, तात्पुरते छत व झाडांच्या सावलीची व्यवस्था करण्याचेही त्यांनी सुचविले.
याशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, कारण पाण्याअभावी अनेक पशु-पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जनजागृती फलक, सूचना व आपत्कालीन मदत क्रमांक शहरातील प्रमुख ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
चंद्रपूर शहरातील नागरिक व पशुधन यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्य रक्षणासाठी या उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी युवा नेता सोहम बुटले यांनी केली.




